Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांना सहा हजार मास्क आणि ग्लोव्हजचे वाटप; पोलीस ठाण्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तीन हजार मास्क आणि तीन हजार ग्लोव्हजचे वाटप करण्यात येत आहे. काही पोलीस ठाण्यात वाटप झाले असून काही पोलीस ठाण्यात वाटप करण्याची प्रकिया सुरु आहे. तसेच अन्य खबरदारीचे उपाय देखील केले जात आहेत. सर्व पोलीस स्टेशन, पोलीस वसाहती आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भात टाळण्यासाठी महापालिका, आरोग्य, महसूल, पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहेत.

पोलिसांचा संबंध थेट समाजाशी येतो. त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करावे लागते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच त्यांच्या कामात कोरोनामुळे कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तीन हजार एन 95 मास्क आणि तीन हजार ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले आहे. आवश्यता भासल्यास आणखी मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

पोलीस चौकी आणि पोलीस ठाण्यांमध्ये देखील नागरिकांचा सारखा राबता असतो. पोलीस ठाण्यात काम केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी घरी जातात. यातून पोलीस वसाहतींना देखील धोका संभवू शकतो. यासाठी शहरातील सर्व पोलीस वसाहती, पोलीस कार्यालये आणि परिसरात वेळोवेळी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि ग्लोव्हजचे वापर करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वाटप केले जाईल. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच पोलीस चौकी, पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तालयात जावे. अन्यथा ई-मेल, ई-कम्प्लेंट याचा पर्याय वापरावा. आजारी असलेल्या नागरिकांनी शक्यतो आयुक्तालयात येणे टाळावे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.