Chinchwad : स्लाइड शो मधून उमगले लेह लडाखचे राकट सौंदर्य

एमपीसी न्यूज- लेह लडाखचे सृष्टीसौंदर्य, क्षणाक्षणाला पालटणारे त्याचे स्वरूप, तेथील खडतर जीवन, एकीकडे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे बौद्ध भिक्षु तर दुसरीकडे पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या आपल्या भारतीय जवानांची शौर्यगाथा सांगणारी कारगिलची भूमी. हे सर्व ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली ती सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी काढलेल्या निवडक 254 छायाचित्रांच्या स्लाईड शोमधून !

देवदत्त कशाळीकर व देवदत्त फोटोग्राफी स्कूलतर्फे चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये या स्लाइड शो चे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये देवदत्त कशाळीकर यांनी लेह लडाखला वेगवेगळ्या सीझनमध्ये भेट देत असताना काढलेली निवडक 254 छायाचित्रे दाखवण्यात आली. छायाचित्रातील रंगसंगती, अचूक जमलेली अर्थपूर्ण चित्रचौकट यामुळे प्रत्येक छायाचित्र नेत्रसुखद, आशयघन आणि पाहणाऱ्याला लेह लडाख भूमीचे दर्शन घेण्यासाठी प्रेरणा देणारे ठरले.

कशाळीकर यांनी फक्त छायाचित्रे दाखवली नाहीत तर ते काढण्यासाठी लागलेला वेळ, तो क्षण टिपण्यासाठी लागलेली चिकाटी तसेच छायाचित्र काढण्यामागील उद्देश आणि चित्राची तांत्रिक बाजू उलगडून सांगितली. ल्हामा, त्यांचे राहणीमान, शांतीचा संदेश देणारे बौद्ध भिक्षु, तेथील प्रार्थनास्थळे, जुन्या इमारती, नुब्रा व्हॅली, पॅनगॉन लेकची निसर्गाच्या विविध मूडमधील छायाचित्रे प्रत्येकाला एकदा तरी लेह लडाखला भेट देण्याची इच्छा निर्माण व्हावी अशी होती. लेह लडाखचे सौंदर्य पाहायचे असेल तर टुरिस्ट म्हणून जाऊ नका, तिथे निवांतपणे वेळ काढून जा असा सल्लाही कशाळीकर यांनी दिला.

जाता जाता लेहच्या या सौंदर्यावर चीनची वाकडी नजर आहे हे सांगत असताना आपले भारतीय जवान त्याठिकाणी शरीर गोठवणाऱ्या थंडीतही डोळ्यात तेल घालून पहारा देत असल्याचे सांगितले. या स्लाइड शो मधून प्रेक्षकांना फक्त लेह लडाखचे राकट सौंदर्य दिसले नाही तर कारगिलच्या भूमीवरील युद्ध स्मारक आणि त्या ठिकाणी फडकणारा तिरंगा पाहून उपस्थितांचा उर देशप्रेमाने भरून देखील आला. वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक राजेंद्र गावडे, अश्विनी चिंचवडे, नाना शिवले, हिंजवडीचे माजी सरपंच शामराव हुलावळे, कैलास पवार, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, लेखक, नामदेव जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.