Chinchwad : संचारबंदीत स्मार्ट गुन्हेगारीला उधाण; पेटीएम केवायसी, ईएमआय थांबविण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार सुरू

एमपीसी न्यूज – पेटीएम केवायसीच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी शेअर करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. संचारबंदीत गुन्हेगार स्मार्ट पद्धतीचा वापर करून गुन्हे करीत आहेत. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

संचारबंदीच्या काळात हाणामारी आणि चोऱ्यांचे प्रमाण घटले आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोख खरेदी ऐवजी नागरिक ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा सायबर चोरटे घेताना दिसत आहेत. पेटीएम केवायसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत आहे. सायबर विभागाकडे मार्च महिन्यात याबाबतच्या 18 तक्रारी, तर एप्रिल महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सहा तक्रारी आल्या आहेत.

अशी केली जाते फसवणूक

सायबर चोरटे मेसेज पाठवून केवायसी न केल्यामुळे आपले पेटीएम खाते बंद करणार असल्याचे सांगतात. जर खाते सुरू ठेवायचे असेल तर पुढील लिंकवर माहिती पाठविण्याचे आवाहन करतात. या भूलथापांना नागरिक बळी पडतात. आपल्या पेटीएम खात्यासह आलेला ओटीपी क्रमांकही चोरट्यांना देतात. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आपल्या खात्यातील रक्‍कम चोरीला जाते.

‘आम्ही बँकेतून बोलत आहे. तुमचा ईएमआय स्थगित करण्यासाठी बँकेकडून एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो ओटीपी आमच्याशी शेअर करा. ज्यामुळे तुमचा ईएमआय स्थगित होईल. अन्यथा तुम्हाला ईएमआय भरावा लागेल.’ असे सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फोन करून सांगितले जाते. नागरिकांनी ओटीपी शेअर केल्यास त्यांच्या बँक खात्यातून तात्काळ रक्कम काढून घेतली जाते.

त्यामुळे नागरिकांनी अशा गुन्ह्यांना बळी पडू नये. बँकेकडून कधीही ओटीपी विचारला जात नाही. बँकेबाबतची गोपनीय माहिती कुणाशीही शेअर करू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

पेटीएमचे केवायसी करण्याची आवश्‍यकता नसते. आपल्याला आलेली कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नका. कोणतीही बॅंक एटीएम किंवा आपल्या खात्याबाबत फोनवरून माहिती विचारत नाही. जर खूपच आवश्‍यकता असेल तर बॅंकेच्या शाखेत जाऊन आलेल्या मेसेजची खात्री करावी.  सुधाकर काटे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.