Chinchwad : बॅचलर लाईफच्या खवय्येगिरीचा तडका ‘स्नॅक साॅंग’; खवय्यांवर आधारित गीताचा संगीत अनावरण

एमपीसी न्यूज – रेझोनन्स स्टुडिओ प्रस्तुत ‘स्नॅक सॉंग’ या खवय्यांवर आधारित असलेल्या आगळ्यावेगळ्या गीताचा संगीत अनावरण सोहळा चिंचवड येथे पार पडला. बॅचलर्स व त्यांच्या नाष्टा, उपहाराचे अड्डे यांना उद्देशून केलेले हे गीत ‘स्नॅक्स सॉंग’ या नावाने स्टुडिओच्या यूट्यूब चैनलवरून 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती स्टुडिओचे संचालक दिग्दर्शक व संकलक बी. महंतेश्वर यांनी दिली.

यावेळी संगीतकार व रेझोनन्स स्टुडिओचे संचालक तेजस चव्हाण म्हणाले, सीडीज कॅसेट्स यांचा काळ गेल्यानंतर स्वतंत्र संगीत सृष्टीच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. पण, अलीकडेच युट्युब आणि भारतात येऊ घातलेल्या स्ट्रीमिंग कंपन्यांमुळे संगीत सृष्टीला एक भक्कम आधार मिळाला आहे. भारतीय संगीत सृष्टीला चांगले दिवस येत आहेत. पण, तरीही काही मोठ्या कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे चांगल्या संगीताची वाणवा जाणवतेच.

सध्याची हीच परिस्थिती बदलत नव्या कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी रेझोनन्स स्टुडिओच्या वतीने नवी चळवळ सुरू केली आहे. रेझोनन्स स्टुडिओ सर्व संगीतप्रेमींना व कलाकारांना एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. याच उपक्रमाचे दुसरे खास गाणे प्रेक्षकांसाठी आणले आहे.

गणेश साबळे यांनी स्टुडीओच्या कामाबाबत आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. मराठी ‘ब्रेथलेस’ व ‘सतरंगी राजस्थान’ यासारख्या नावाजलेल्या गीतानंतर रेझोनन्स स्टुडिओने रेझोनन्स ओरिजनल या शृंखलेअंतर्गत नव्या गीतांची निर्मिती सुरू केली आहे. स्नॅक सॉंग हे या शृंखलेतील दुसरं गीत आहे. मागील महिन्यात अनिकेत मनोहरे याचे ‘गम नही’ हे पहिलं रॅप गीत स्टुडिओच्या यूट्यूब चैनल वरून प्रदर्शित झाले. तरुणांचा या गीताला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

येत्या काळात रेझोनान्स स्टुडिओ नेहा महाजन, विजय आंधळकर व अभय जोधपुरकर या मोठ्या कलाकारांसोबत एक हिंदी गीत घेऊन येत आहे. तर येत्या काळात नवनवीन संस्थांनी पुढे येऊन या चळवळीला व पिंपरी-चिंचवड शहराला म्युझिक हब म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

रेझोनन्स स्टुडिओला या चळवळीसाठी पिंपरी-चिंचवडमधील अरिहंत मिसळ आणि ‘शाउटोपिया डॉट इन’ या संस्थांकडून विशेष सहकार्य मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.