Chinchwad : शून्यांतून विश्व निर्माण करताना सामाजिक बांधिलकी जपा -आमदार गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृती ही अति प्राचीन असून सत्कर्म करणाऱ्यांचा सन्मान करणारी आहे. समाजात शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करीत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींचा गौरव शिवशंभो फाउंडेशन करते, ही स्तुत्य बाब आहे, असे मत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

शिवमंदिर प्रांगणात महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशनने आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते अभिषेक विद्यालयमचे संस्थापक, बांधकाम व्यावसायिक गुरुराज चरंतीमठ आणि बांधकाम व्यावसायिक बजरंग गडदे यांना शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार २०१९ ने सन्मानित केले.

  • यावेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक केशव घोळवे, स्विकृत नगरसेवक माउली थोरात, उद्योजक महेंद्र पाटील, माई सांडभोर, शिवशंभो फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तोरखडे आदी उपस्थित होते.

स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना गुरुराज चरंतीमठ यांनी, “कर्नाटकातील ग्रामीण भागातून चरितार्थासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आलो. अगदी लहानसहान गोष्टींचा अभ्यास करीत शिक्षण, सौरऊर्जा, बांधकाम क्षेत्रात यश मिळवले!” अशा भावना व्यक्त केल्या; तर बजरंग गडदे यांनी, “माढा तालुक्यातील एका लहान खेड्यातून येथे आलो. जीवनात भेटलेली माणसे आणि अनुभवातून शिकत बांधकाम क्षेत्रात काम करता आले!” असे आपल्या मनोगतातून सांगितले.

  • त्यानंतर इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे यांनी आपल्या प्रास्ताविकातून फाउंडेशनने एकोणीस वर्षे राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

अजित भालेराव, राजेश हजारे, काळुराम साकोरे, रूपाली तोरखडे, रेणुका हजारे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. दत्तात्रय तरटे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.