Chinchwad : शालेय शिक्षणासोबत सामाजिक शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे – डॅा. राजेंद्र कांकरिया

एमपीसी न्यूज – “वाचन आणि श्रवणाच्या सातत्यपूर्ण संस्कारातून उत्तम कवितेचा जन्म होतो. शालेय शिक्षणासोबत सामाजिक शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे मत डॅा. राजेंद्र कांकरिया यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाची 26 वी श्रावणी काव्यस्पर्धा काळभोरनगरमधील प्रतिभा कॅालेजमध्ये संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, संवेदनाचे नितीन हिरवे, रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, सविता इंगळे, प्रभावती रायकर, प्रा.अनुजा गडगे, हेमांगी जाधव, डॉ. शिवाजी विधाटे, गोविंद पवार, भरत बारी, उज्ज्वला केळकर, मनिषा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा.तुकाराम पाटील म्हणाले, आपल्या अनुभवांचा रस कवितेतून सादर व्हायला हवा. तसेच काव्य सादरीकरण कसे असावे, याबाबत मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव म्हणाले, कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार, कविता म्हणजे विचारांचे संस्कार आणि कविता म्हणजे भावनांचा आविष्कार आहे. नादाच्या पलिकडे जाऊन अनाहत नाद कविंनी शोधावा तर बहिणाबाईसारखी अजरामर कविता लिहिली जाईल. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाची कविता त्यांनी सादर केली.

मंडळाचे सल्लागार रमेश वाकणीस म्हणाले, आपली उत्तम काव्यकृती तेवढ्याच उत्तम रितीने रसिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कवीचीच असते. सुयशच्या संचालिका भाग्यश्री यादव यांनी मंडळाला कै. सुनील यादव जेवढे सहकार्य करत होते तेवढेच सहकार्य मी सुध्दा करेल, हे आश्वासन दिले.

या काव्यस्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून पन्नास कवी सहभागी झाले होते. त्यातील २० कवीना स्पर्धेसाठी बोलावण्यात आले. त्यामधून पारितोषिक विजेते खालीलप्रमाणे :- प्रथम – इंदिरा भणगे (फोनगाणे), द्वितीय – स्नेहल चव्हाण (मर्म जगण्याचे), तृतीय – श्रीकृष्ण पुरंदरे (भातुकली), उत्तेजनार्थ – पौर्णिमा ढेरे (क्षितिज माझे) उत्तेजनार्थ – बाळकृष्ण बाचल (बाळ बोले आजीला), काव्य परीक्षण प्रा. पी. बी. शिंदे व जेष्ठ कवयित्री मानसी चिटणीस यांनी केले.

यावेळी कवी संमेलनात नंदकुमार कांबळे, मधुश्री ओव्हाळ, बी.एस.बनसोडे, दिनेश भोसले, निलेश शेंबेकर, आनंदराव मुळूक, रघुनाथ पाटील, आय. के. शेख, आदींनी कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे आयोजन अनिकेत गुहे, नंदकुमार मुरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या काव्याचे सूत्रसंचालन माधुरी ओक यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. प्रस्तावना संपतराव शिंदे तर, अरविंद वाडकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like