Chinchwad: आध्यात्मिक गुरु हेमंतभाई दहिवलीकर महाराज यांना देवाज्ञा

एमपीसी न्यूज- आध्यात्मिक व धार्मिक मार्गाने हजारो भक्तांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणणारे आध्यात्मिक गुरु हेमंतभाई जगन्नाथ दहिवलीकर महाराज (वय 58) यांना नुकतीच दीर्घ आजारानंतर चिंचवड येथे देवाज्ञा झाली.

हेमंतभाई यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली आणि हजारो शिष्यगण असा परिवार आहे. हेमंतभाईंच्या स्वर्गवासाने यांच्या परिवारावर व हजारो भक्तांवर शोककळा पसरली आहे.

सदगुरू दत्तदास (जगन्नाथ) दहिवलीकर महाराज यांची कळंब (ता. कर्जत, जिल्हा रायगड) येथे समाधी आहे. याच ठिकाणी हेमंतभाई महाराज यांनी श्री दत्तदास दहिवलीकर महाराज दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून श्री क्षेत्र कळंब देवस्थानची उभारणी केली. कळंब येथील दत्तधाम मंदीर हे प्रतीगाणगापूर म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणपूर देवस्थानची स्थापना करणारे सद्गुरु जगन्नाथ (दत्तदास) दहिवलीकर महाराज यांचे ते सुपुत्र होत.

हेमंतभाई कल्याण येथे निवास करत होते, मात्र कळंब येथे उभारलेल्या प्रतीगाणगापूर दत्त मंदीरात दत्त महाराजांच्या सेवेत त्यांनी ३५ वर्षे सेवा केली. हेमंतभाईंनी महाराष्ट्रातील हजारो भाविकांना व शिष्यांना आध्यात्मिक व भक्तीमार्गाने प्रबोधन केले व त्यातून या सर्वांचे जीवन संपन्न केले.

दहिवलीकर महाराजांनी श्री क्षेत्र कळंब या दत्तधाम मंदिरामध्ये नवग्रह मंदिर, शिवलिंग, भोजनकक्ष, भक्तनिवास, ग्रंथ पारायण कक्ष अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती ट्रस्टचे खजिनदार संतोष घोणे (निगडी) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.