BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : कठोर मेहनतीमुळेच यश प्राप्ती –  विश्वास नांगरे पाटील

‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे थाटात उद्‌घाटन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – लोकांच्या गरजा आणि प्रश्न समजून घेऊन पोलीस प्रशासनाने जनतेशी संवाद साधावा. गरजा ओळखून पोलिसिंग केले गेले, तर पोलीस व नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे शक्‍य होईल. कठोर मेहनतीमुळेच आयुष्यात यश प्राप्त करता येते, असे असा कानमंत्र कोल्‍हापूर पोलीस परिमंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी युवकांना चिंचवड येथे शनिवारी (दि. 12) दिला.

पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेल्‍या महोत्सवाचे उद्‌घाटन नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऍड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका अनुराधा गोरखे, कामगार नेते इरफान सय्यद, अमित गोरखे, भाजपचे पदाधिकारी, संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी पाणी बचतीवर संदेश देणारा ‘बंडाळ’ हा लघुपट उपस्थितांना दाखविण्यात आला. यावेळी ऍड. सचिन पटवर्धन, राहुल सोलापूरकर यांनी नांगरे पाटलांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी पिंपरी चिंचवड मधील युवकांचा ‘मोरया फेस्टिव्हल’ला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईतील ‘मल्हार’ महोत्सवाप्रमाणे हे फेस्टिव्हल नावारुपास येईल, अशा शुभेच्‍छा नांगरे पाटील यांनी दिल्‍या.

गावचा खविस ते दहशतवादी कसाबला पकडण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला या प्रश्नाला उत्तर देताना नांगरे पाटील म्‍हणाले, ग्रामीण भागातील भूत ही गावातील चर्चा असते. मला एकदा खोलीत रात्रभर कोंडून ठेवण्यात आले. मला खूप भीती वाटली. सकाळपर्यंत जीवंत राहू का असा प्रश्न मनात आला. पण, दमलो असल्‍याने झोप लागली. दुस-यादिवशी सहिसलामत खोलीतून बाहेर आला आणि मनातील भीती पळून गेली. साहस आणि भीती यामध्ये खूप कमी अंतर असते. माझे वडील पैलवान होते. त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा होती. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले. त्यातूनच आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत गेलो. 26/11 च्या मुंबई हल्‍ल्‍या वेळी ताज हॉटेलची पूर्वी रेकी केलेली होती. त्याचा फायदा झाला. त्यावेळी नागरिक आणि सहका-यांचे मृतदेह समोर होते. सर्वत्र रक्‍ताचा सडा पडलेला होता. क्षणभर भीती वाटली पण, तद्‌नंतर शांतचित्ताने धाडस दाखवत दहशतवाद्यांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत त्यांचा खात्‍मा केला. कॉन्सटेबल तुकाराम ओंबाळे यांनी शिताफीने कसाबला घट्‍ट पकडले. म्हणूनच भारतावर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद जगासमोर आणता आला. या दुर्घटनेवळी मी जीवंत आहे की नाही, याविषयी कुटुंबासह सर्वांना शंका वाटत होती. घटनास्थळावरून बाहेर आल्यानंतर प्रथम घरी फोन करून मी सुखरूप असल्‍याचे कळवले.

तुम्‍हा सिनेमाची ऑफर आली नाही का, याप्रश्नावर नांगरे पाटील म्‍हणाले, पूर्वी फिल्‍मस्टारची भेट घेण्यासाठी की त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासंतास वेळ घालवला. पण मुंबईत नियुक्‍ती झाल्‍यानंतर सुरक्षाविषयक बाबींसाठी फिल्‍मस्टार माझी अपॉन्टमेंट घेण्यासाठी वेळ मागत असत. चित्रपटसृष्टीत चांगले व समाजोपयोगी कार्य करणारे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत. अक्षयकुमार हा त्यातीलच एक आहे. त्याने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना तीन कोटींची मदत केली. अक्षयबरोबर चांगली मैत्री असल्‍याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित युवकांनी नांगरे पाटील यांना प्रश्न विचारले. त्याची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

प्रारंभी ऍड . सचिन पटवर्धन प्रास्ताविकात म्‍हणाले, पिंपरी चिंचवडची मागील 40 वर्षात औद्योगिक नगरीकडून शैक्षणिक नगरीकडे वाटचाल झाली असून त्यामध्ये प्रगती केली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्‍या मोठ मोठ्या शैक्षणिक संस्था शहरामध्ये कार्यरत आहेत. आजचे तरुण हे पिंपरी चिंचवड शहराचे भविष्य आहे. शहरातील मुलांना कला, क्रीडा प्रकारातील आपले नैपुण्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कर्तव्य फाऊंडेशन कार्य करत आहे. या फेस्टिव्हल मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 45 शाळा, महाविद्यालयांमधील 2500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. फाऊंडेशन कला, क्रीडा मार्गदर्शन, स्पर्धा याबरोबरच विविध विषयातील देशातील तसेच परदेशातील शिक्षण संधी, संरक्षण क्षेत्रातील संधी, महिला, युवकांसाठी स्वयंरोजगाराची क्षेत्रे, शासनामार्फत चालवल्या जाणा-या सरकारी योजना आदींबाबत मार्गदर्शन करते, असे पटवर्धन यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील, ज्योतिका मलकानी, किरण येवलेकर, प्रा. शिल्‍पागौरी गणपुले, चेतन फेंगसे, देवदत्त कशाळीकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार सुयश खटावकर यांनी मानले. यावेळी रांगोळी, पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास युवक, युवती, विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4

.