Chinchwad : शहरातील सर्व मॉलचे होणार सर्वेक्षण; पोलिस आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मॉलच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मॉलमधील पार्किंग व्यवस्था कमी असल्याने तसेच मॉलमधील पार्किंगसाठी पैसे घेतले जात असल्याने नागरीक रस्त्यांवर वाहने लावतात. त्यामुळे शहरातील सर्व मॉलचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिल्या आहेत.

शहरातील सर्व मॉलची माहिती घेण्यात येणार आहे. ज्या मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा मॉलवर कारवाई केली जाणार आहे. मॉलमध्ये येणा-या ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगची जबाबदारी मॉल प्रशासनावर आहे. मॉलमध्ये येणा-या ग्राहक संख्येच्या दोन टक्के वाहनांना पार्किंग उपलब्ध करावी लागते. मात्र, मॉल प्रशासनाकडून काही वेळेला मॉलच्या पार्किंग व्यवस्थेचे काम एखाद्या कंपनीला दिले जाते. संबंधित कंपनी मॉलमध्ये येणा-या नागरिकांकडून पार्किंगसाठी पैसे घेते.

  • मॉल प्रशासनाकडून होणा-या बेकायदेशीर लुटीबाबत कोणताही ग्राहक बोलत नाही. एखादा बोलला तर त्याचे वाहन मॉलच्या पार्किंगमध्ये लावू दिले जात नाही. या लुटीपासून सुटण्यासाठी ग्राहक सरळ रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करतात. यामुळे वाहतूककोंडी होते. अनेक वेळेला मॉलच्या बाहेर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत दंडात्मक कारवाईची मोहीम राबवण्यात येते. पण, ही मोहीम म्हणजे मूळ इलाज नाही.

मॉलच्या परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना शहरातील सर्व मॉलचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मॉल प्रशासनाला ग्राहकांच्या वाहनांच्या योग्य पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत सांगण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.