Chinchwad: मित्रासोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अपघाताचा गुन्हा दाखल

Chinchwad: Suspicious death of a young man who went to walking with a friend; Accident case filed मृत दीपक आणि त्याचा मित्र शंकर तिखे हे दोघेजण जेवण झाल्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी पवनानगर परिसरात गेले.

एमपीसी न्यूज- मित्रासोबत रात्री शतपावली करत असताना भरधाव आलेल्या रिक्षाने तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 27) रात्री चिंचवड येथे घडली. मात्र हा प्रकार संशयास्पद असून, झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मृत व्यक्‍तीच्या नातेवाइकांनी केली आहे.

दीपक सुधाकर गायकवाड (वय 32, रा. मोरया हाऊसिंग सोसासटी, वेताळनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ दत्ता गायकवाड (वय 20, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. लखन प्रताप थोरात (वय 28, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मृत दीपक आणि त्याचा मित्र शंकर तिखे हे दोघेजण जेवण झाल्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी पवनानगर परिसरात गेले. शंकर हा पदपथावरून तर मृत दीपक हा पदपथालगत रस्त्यावरून जात होते.

त्या वेळी भरधाव आलेल्या आरोपी सौरभच्या रिक्षाने दीपक यास जोरदार धडक दिली. दीपकला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या दीपकचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दीपक यास त्याचा मित्र शंकरने ढकलून दिल्याने तो अचानक रस्त्यावर आला आणि त्याचा रिक्षाला धडकून अपघात झाल्याचे आरोपी रिक्षाचालक सौरभ याने सुरवातीला सांगितले.

मात्र दीपक हा पदपथाच्या कडेने चालला असताना 20 फुटांचा रोड सोडून सौरभ पदपथाच्या शेजारी रिक्षा घेऊन भरधाव का आला, असा प्रश्‍न दीपक यांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.

तसेच दीपक अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मित्र शंकरने त्यास रुग्णालयात नेण्याऐवजी घरी जाऊन आंघोळ केली. कपडे बदलून तो पुन्हा खाली आला.

त्याच इमारतीत राहणाऱ्या दीपकच्या नातेवाइकास अपघाताबाबत का नाही सांगितले, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

हा निव्वळ अपघात नसून याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दीपकच्या नातेवाइकांनी केली आहे. जोपर्यंत शंकर याच्यावरही कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. तसेच मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली.

अपघाताचा गुन्हा दाखल करून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.