Chinchwad : वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातून 132 सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 पोलीस स्टेशन आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वगळता इतर 14 पोलीस स्टेशनमधून 132 सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सरत्या वर्षात तडीपार केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने सुरु झालेल्या आयुक्तालयामुळे पोलिसांचा राबता वाढला आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक निर्माण होत आहे. तसेच गुन्हेगारी कुरापती करणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जात आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून तडीपार आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया केल्यास गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होतो.

गुन्हेगार दत्तक योजना सुरू
त्यातच पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हेगार दत्तक घेण्याची योजना सुरु केली आहे. पोलीस ठाण्यातच्या हद्दीतील गुन्हेगारांना पोलिसांनी दत्तक घ्यायचे आणि त्याच्यावर बारीक लक्ष द्यायचे. वेळोवेळी त्याची तपासणी करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. पोलीस नियमितपणे गुन्हेगार तपासत आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर यामुळे पोलिसांचे लक्ष राहिले आहे. पोलिसांचे आपल्यावर लक्ष असल्याचे जाणवल्याने गुन्हेगारांनी देखील कुरापती बंद केल्या आहेत. यामुळे मागील वर्षभरात टोळीयुद्ध सारख्या घटना घडलेल्या नाहीत.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोव्हेंबर 2018 ते 15 नोव्हेंबर 2019 या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीतील 132 गुन्हेगारांना तडीपार केले आहे. सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत हा तडीपारीचा कालावधी आहे. 90 गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी, सहा गुन्हेगारांना दीड वर्षासाठी, 24 गुन्हेगारांना एक वर्षासाठी तर 12 गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एक मधून 75 तर परिमंडळ दोनमधून 57 गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील म्हणाल्या, “ज्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड आहे. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी तीन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. येत्या काही दिवसात त्यांनाही तडीपार केले जाईल. यामुळे शहरात शांतता राहते. तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहतो. त्यासाठी ही कारवाई पुढे देखील सुरु राहणार आहे.”

पोलीस स्टेशन आणि तडीपार गुन्हेगारांची संख्या –

परिमंडळ एक
पिंपरी विभाग –
पिंपरी – 14
चिंचवड – 09
निगडी – 06
भोसरी – 03

एमआयडीसी भोसरी – 20
चाकण विभाग –
आळंदी – 06
चाकण – 09
दिघी – 08

परिमंडळ दोन:
वाकड विभाग –
सांगवी – 12
वाकड – 19
हिंजवडी – 08

देहूरोड विभाग –
देहूरोड – 10
चिखली – 02
तळेगाव – 06
तळेगाव एमआयडीसी – 00

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.