Chinchwad:  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी ‘ईएसआय’ हॉस्पिटल ताब्यात घ्या – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भविष्यकाळात निर्माण होणारा धोका, वाढणारी रुग्ण संख्या विचारात घेऊन अधिकच्या खाटांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी चिंचवड येथील ‘ईएसआय’ हॉस्पिटल  ताब्यात घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविले आहे. त्यात बनसोडे यांनी म्हटले आहे की, चिंचवड येथील ‘ईएसआय’ हॉस्पिटल ‘कोविड रुग्णालय’ म्हणून पिंपरी महापालिकेकडे तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध कर्मचाऱ्यांसह हस्तांतरित करावे. हे  रुग्णालय हे प्रशस्थ व सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. रुग्णालयाची  क्षमता 100 बेडची आहे. 21 डॉक्टर, 49 स्टाफ नर्सेस, 58 वॉर्डबॉय व स्वीपर्स असा कर्मचारीवर्ग उपलब्ध आहे.

सध्या शहर परिसरातील उद्योग बंद असल्याने या रुग्णालयात आजची अंतररुग्ण संख्या केवळ 6 आहे. स्वतंत्र इमारत व सुरक्षित व्यवस्था या ठिकाणी असल्याने हे रुग्णालय महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तात्पुरते ताब्यात घ्यावे. त्या ठिकाणचे उपलब्ध मनुष्यबळ वापरून कोरोना बाधित रुग्णांवर  उपचार करावेत.  याशिवाय राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मोरवाडी, चिंचवड ही रुग्णालये देखील ‘कोविड रुग्णालय’ म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेडे तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध कर्मचाऱ्यांसह हस्तांतरित करावे, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.