Chinchwad : आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलिसांची टाळाटाळ

पोलीस निरीक्षकांच्या हलगर्जीपणाबाबत फिर्यादीकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलीस टाळाटाळ करीत आहेत. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला नागरिकांनी कोथरूड येथे पकडून ठेवले असता पुरावे नसल्याचे कारण सांगत त्याला ताब्यात घेण्यास तळेगाव पोलिसांनी नकार दिला. याबाबत फिर्यादी नवनाथ राठोड यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोठ्या रकमेच्या मोबदल्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. बिबवेवाडी, पुणे) याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 30 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नवनाथ आसाराम राठोड (वय 29, रा. मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.

नवनाथ यांची आरोपी लक्ष्मण याच्यासोबत एका मित्राच्या मदतीने ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेऊन लक्ष्मण याने शेअर मार्केटमध्ये दोन लाख रुपये गुंतवल्यास तीन महिन्यांनी चार लाख 40 हजार रुपये परत मिळतील, असे आमिष दाखवले. तसेच त्याबाबतचा करार देखील आरोपीने नवनाथ यांच्यासोबत केला. नवनाथ यांनी लक्ष्मण याला दोन लाख रुपये दिले. त्यातील दीड लाख रुपये एका कंपनीत गुंतवण्यास सांगितले. नवनाथ यांनी शेअर मार्केटसाठी लागणारे डी मॅट अकाउंट काढले. त्याचा खाते नंबर व पासवर्ड लक्ष्मण याला दिला.

डी मॅट खाते सुरु झाल्यानंतर नवनाथ यांच्या खात्यात पाच टप्प्यांमध्ये 47 हजार 442 रुपये परत आले. त्यांनी गुंतवलेल्या दोन लाख रुपयांपैकी केवळ 47 हजार रुपये आले. उर्वरित 1 लाख 53 हजार रुपयांबाबत विचारणा केली असता लक्ष्मण याने दोन बँकांचे दोन धनादेश दिले. मात्र, ते धनादेश वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवनाथ यांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी फरार झाल्याचे कारण सांगत तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बुधवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास कोथरूड येथे नागरिकांनी आरोपीला पकडले. याबाबत तळेगाव पोलिसांना व नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मात्र, तळेगाव पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.

त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला नेले. बिबवेवाडी पोलिसांनी देखील तळेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र, तळेगाव पोलिसांनी आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे कारण दिले. बिबवेवाडी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला आरोपीला सोडत असल्याचे कळवले. या प्रकरणात तळेगाव पोलीस जाणीवपूर्वक आरोपीवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा फसवणूक झालेल्या सर्वांना घेऊन उपोषण करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like