Chinchwad : मुख्याध्यापक स्मार्ट झाले तर विद्यार्थी स्मार्ट बनतील – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – प्रत्येक शाळा-महाविद्यालय विद्यार्थ्यांना टेक्नोसेव्ही बनविण्याच्या प्रयत्नात आहे. पण जे शिक्षक, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना स्मार्ट बनविण्यासाठी धडपड करत आहेत, त्यांना सुरुवातीला स्मार्ट होणे आवश्यक आहे. जर मुख्याध्यापक स्मार्ट असतील तर विद्यार्थी स्मार्ट बनतील, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर सभागृहात मुख्याध्यापकांची बैठक शनिवारी (दि.15) घेण्यात आली. या बैठकीत महापौर राहुल जाधव बोलत होते. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, सदस्या संगीता भोंडवे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते

महापौर जाधव म्हणाले, “शाळेमध्ये बदल घडविताना प्रथम स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे. शिक्षण विभागाच्या बजेटपैकी 80 टक्के खर्च आस्थापनेवर होत आहे. असे असून सुद्धा शिक्षक का कमी पडत आहेत. येईल तो दिवस पुढे ढकलला, अशी परिस्थिती महापालिका शाळांत आजवर पाहायला मिळाली. पण आता तसे चालणार नाही. तुमच्या शाळेत समस्या असतील, तर त्या सांगा म्हणजे सोडविल्या जातील. महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहराचा नावलौकिक वाढवावा. त्यासाठी लवकरच महापालिका शिक्षकांसाठी ‘शिक्षक मेळावा’ घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या 105 शाळांना आयएसओ मानांकन मिळावे, असे माझे स्वप्न आहे. ते मला सत्यात उतरवयाचे आहे.”

सभापती गव्हाणे यांनी उन्नती प्रकल्पा’विषयी मुख्याध्यापक व शिक्षकांना 31 जानेवारीची डेडलाईन दिली, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. डॉ. साळवे व डॉ. डांगे यांनी रूबेला लस विषयी माहिती देत, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लवकरच लोहाच्या गोळ्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.