Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी आगीच्या दहा घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – शहरात सगळीकडे ‘जनता कर्फ्यू’ चे पालन होत असताना आज (रविवारी) चिंचवड परिसरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याचे समोर आले. संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेत सर्व आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये खासगी कंपनी, गोडाऊन, घर व सुकलेले गवत यांचा समावेश आहे. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळी साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथील महिंद्रा कंपनीला आग लागल्याचे समोर आले. या आगीवर नियंत्रण मिळवत असतानाच चिखली येथे एका रबर कंपनीला आग लागल्याचे समोर आले. दुपारी बारा वाजता भोसरी एमआयडीसी येथे प्रयाग इंडस्ट्रीजवळ लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवेले. दुपारी दोन वाजता चिखली येथील रामनगर परिसरात कचरा डेपोला आग लागली होती. त्याच सुमारास काळभोरनगर येथील सुखलेल्या गावाताला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणली.

वाल्हेकरवाडी येथील घराला दुपारी तीनच्या सुमारास आग लागल्याची माहिती चिंचवड अग्निशमन दलाला मिळताच अनिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. त्यानंतर वाकड येथील एका ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग, चिंचवड येथे सुखलेले गवताला लागलाली आग तसेच ऑटो क्लस्टर येथे स्क्रॅपला लागलेली आग व त्याच दरम्यान हिंदुस्थान अँटी बियॉटिक्स मैदानावर लागलेल्या आगीवर चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. घडलेल्या सर्व घटनांपैकी कोणत्याच घटनेत जीवितहानी झाली नाही.

एकीकडे सर्व ठिकाणी ‘जनता कर्फ्यू’चे पालन होत असताना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.