Chinchwad: बारामतीकरांची पुणे जिल्ह्यातील दहशत संपवायचीय – सुभाष देशमुख

पंतप्रधानांसोबत चांगले संबंध असल्याचा अपप्रचार करण्यात बारामतीकर 'तरबेज' ; आगामी निवडणुकीत जिल्ह्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुक्त 'घोषवाक्य' करण्याचे केले आवाहन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आपले चांगले संबंध असल्याचा अपप्रचार करण्यात बारामतीकर तरबेज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार निवडून यावेत असे वाटेल का? , एखादी सभा रद्द झाली की नाहक अपप्रचार केला जातो. त्यामध्ये बारामतीकर तरबेज असून जिल्ह्यातील बारामतीकरांची दहशत संपवायची असल्याचे सांगत राज्याचे सहकार मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे भाजप प्रभारी सुभाष देशमुख यांनी आज (सोमवारी) पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच घराणेशाही संपल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुक्त करण्याचे ‘घोषवाक्य’ करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे आज पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, प्रदेश चिटणीस उमा खापरे, रवी अनासपुरे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी आमदार शरद ढमाले, अमित गोरखे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, राजेश पिल्ले, नगरसेवक बाबू नायर यावेळी उपस्थित होते.

  • पुणे जिल्ह्यात दहशत आहे. दहशतीचा सामना करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्के खात जिल्ह्यात संघटना वाढविली. बारामतीची जिल्ह्यात दहशत आहे. ती दहशत संपवायची असल्याचे सांगत देशमुख म्हणाले, पुणे ग्रामीणमध्ये भाजपची ताकद कमी आहे. 21 पैकी भाजपचे केवळ 3 आमदार आहेत. तर, जिल्हा परिषदेत 75 पैकी 7 जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्ह्यात भाजप वाढविण्याची आता संधी आहे. त्यासाठी सर्वांनी कष्ट करुन पक्ष रुजवा.

विधानसभा निवडणुकीला ‘अगली बार 220 पार’ असा नारा दिला आहे. त्यासाठी प्रयत्न करा. ग्रामीण जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करा. जिल्ह्यातील 21 जागा भाजपच्या आल्या पाहिजेत हा कार्यकर्त्यांचा आशावाद चांगला आहे. परंतु, शिवसेना-भाजपची युती होणार आहे. त्यामुळे कोणती जागा कोणाला सुटणार? याचा तुम्ही विचार करु नका. ते नेतृत्व ठरवेल. जिल्ह्यातील 21 ही आमदार युतीचेच आले पाहिजेत यासाठी आजपासून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

  • लोकसभेच्या निकालानंतर प्रशासकीय अधिकारी बदलले
    सत्ता बदलली तरी अधिकारी बदलत नव्हते. भाजपच्या पदाधिका-यांचे अधिकारी ऐकत नसल्याचे कार्यकर्ते सांगत होते. सरकार बदलले तरी अधिकारी तेच आहेत. भाजप सरकार केवळ पाच वर्ष राहिल आणि पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येईल, असे अधिका-यांना वाटत होते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रशासकीय अधिका-यांमध्ये बदल झाला आहे. आता काही केले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार नाही, हे अधिका-यांनाही कळले आहे. त्यामुळे ते आता भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे ऐकू लागल्याचे सुभाष देशमुख म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.