Chinchwad Crime News : रस्त्यावर तलवारीने केक कापल्याचे प्रकरण पोहोचले आयुक्त दरबारी; आयुक्त म्हणाले ‘अशा विकृतींना समाजात नाही, गजाआड ठेवले पाहिजे’

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी परिसरात बालाजीनगर येथे काही तरुणांनी रस्त्यावर येत तलवारीने केक कापला. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. हे प्रकरण सोमवारी पोलीस आयुक्तांकडे पोहोचले. रस्त्यावर तलवारीने केक कापला अन त्यावर थातूरमातूर कलमान्वये कारवाई झाल्याचे समजताच आयुक्त संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर संतापले. अशा विकृतींना समाजात नाही तर गजाआड ठेवले पाहिजे, असे पोलिसांना सांगितले.

पोलीस आयुक्तांनी थेट वॉकी टॉकी चॅनेलवर संबंधित वरिष्ठ निरीक्षकाची झाडाझडती घेतली. तसेच, आगामी काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबीही दिली.

एमआयडीसी भोसरी ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापून गोंधळ घातला. याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

याव्यतिरिक्त शहरातील काही ठिकाणी टोळके राडा करीत असल्याच्या तक्रारी देखील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत त्यांनी सोमवारी सकाळी थेट चॅनेलवरच झाडाझडती घेतली.

आयुक्त कृष्ण प्रकाश संबंधित पोलिसांना म्हणाले, “तलवारीने केक कापताना जेवढे सामील होते त्या सर्वांवर कारवाई करा. त्यांनी परवानगी घेतली होती का, ते रस्त्यावर आलेच कसे. वाढदिवस साजरा करण्यासाठी चौक किंवा रस्ता असतो का. त्यांच्यावर योग्य कलम न लावता जुजबी कलमा अंतर्गत कारवाई झाली आली. हे फार चुकीचे आहे हे संबंधितांनी नीट लक्षात घ्यावे’.

आशा विकृतींना समाजात नाही, गजाआड ठेवले पाहिजे. आगामी काळात अशा प्रकारची एकही चूक होता कामा नये. अशा गुन्हेगारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे आता आमचे काही खरं नाही. ज्या चौकात ते दहशत पसरवतात त्यांना तेथेच ठोकले पाहिजे. ते कसे काय गर्दी करून दहशत पसरवू शकतात. त्या चौकात त्यांचे राज्य आहे का ? पण हे लक्षात ठेवा चौक सर्वसामान्य नागरिकांचा आहे. कुणाच्या बापाचा नाही’.

काहीजण दुचाकीचा आवाज काढत फिरतात. फॅन्सी नंबरप्लेट लावून रॅश ड्राईव्ह करतात. त्यांच्यावरही कारवाईची मोहीम राबवा. जर पुन्हा माझ्याकडे तक्रारी आल्या तर संबंधित वरिष्ठ निरीक्षकाची त्यांच्या हद्दीवर पकड नाही, असे समजून मेमो दिला जाईल. त्यानंतर मी काय कारवाई करता ते तुम्ही बघालच, असेही आयुक्त म्हणाले.

आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे शहर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.