Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर शहर आणि ग्रामीण भागात समतोल राखण्याचे आव्हान – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहराच्या आसपासचा ग्रामीण परिसर जोडण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहर या दोन्हीमध्ये विशेष फरक आहे. दोन्हीची आव्हाने, व्यवस्था आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्याचा समतोल राखून त्यांना संरक्षण पिंपरी-चिंचवड पोलिसांना द्यावे लागणार आहे. हे आव्हान म्हणून पोलिसांनी स्वीकारले असून अतिशय उत्तम पद्धतीने पिंपरी-चिंचवड पोलीस काम करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “पुणे जिल्हा ग्रामीणची मोठी हद्द होती. त्यातला काही भाग वगळून पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाला जोडला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड स्वतंत्र वाढणारी शहरं आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज होती. ती पूर्ण करून 15 ऑगस्ट रोजी आयुक्तालय कार्यान्वित केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीने आयुक्तालयासाठी स्वतंत्र इमारत देखील मिळाली आहे. संख्याबळ आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. ही समिती विविध बाबींचा अभ्यास करून अहवाल देणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करण्यात येणार आहेत.

वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस यंत्रणा आणखीन लोकाभिमुख करण्याचे काम करण्यात येणार आहे. इंग्रजांनी पोलीस खाते भारतीय लोकांवर राज्य करण्यासाठी तयार केले. पण आता राज्य करण्याची गरज नाही. आता आपल्याला आपल्याच लोकांची सेवा करायची आहे. त्यामुळे पोलीस विभाग आता जनतेची सेवा करण्यासाठी आहे. पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेताना किती गुन्हे झाले, किती लोकांना अटक किंवा शिक्षा झाली. किती गुन्हे उघड झाले. किती कारवाया झाल्या यावर त्याचे मूल्यमापन करायला हवे. पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना सर्व बाबींचा समावेश करायला हवा. मागील चार वर्षात पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांना शहरात वावरायला सुरक्षित वाटणं महत्वाचं आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला पाहिजे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. आयुक्तालय सुरु झाल्यापासून गुन्ह्यांची नोंद सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात गुन्हेगारी वाढलेली नाही. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सामान्य माणूस जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत पोलीस यंत्रणा यशस्वी होणार नाही. पुढील काळात पिंपरी-चिंचवड पोलीस लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like