Chinchwad : शहरातील तिन्ही नद्या स्वच्छ होणार – राहुल जाधव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवना नदीची महाआरती; सांडपाण्यावर प्रक्रिया करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या वाहतात. या सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्या स्वच्छ करण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी संस्थांसह महापालिका प्रशासन उभे राहिले आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये जाणारे सांडपाणी नदीमध्ये जाऊ न देता ते साठवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्या स्वच्छ होणार आहेत, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने पर्यावरणविषयक व्याख्यान व पवना नदीची महाआरती करण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव बोलत होते. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आबा मसूडगे, डॉ. निलेश लोंढे, वीरेंद्र चित्राव, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ. मोहन गायकवाड, राजीव भावसार, सूर्यकांत मुथीयान, विकास पाटील, माणिक धर्माधिकारी, गणेश जवळकर, प्रवीण अहिर, अनिल घोडेकर, सिद्धार्थ नाईक, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरण रक्षणासाठी काम करणा-या डॉ. निलेश लोंढे, दीपक नलावडे, माणिक धर्माधिकारी, रवी सिन्हा, राहुल दानवे, प्रकाश शेडबाळे, रोहन शिंदे, गणेश जवळकर, गणेश बोरा, सोमनाथ हरपुडे, प्रकाश मिर्झापुरे, प्रवीण आहेर, बाबासाहेब काळे, अनुष्का कराळे, अरुण पवार, अनिल घोडेकर, केतकी नायडू, सिद्धार्थ नाईक, रणजित इंगळे, राजेंद्र आहिर, अंजना सोनवणे, राहुल श्रीवास्तव, आण्णा जोगदंड, आबा मसूडगे आदींचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने बालशाहिरांनी दिंडी काढली. ‘पवनामाई आमची माता, आम्ही तिचे रक्षणकर्ता’ अशा घोषणा देत ही जलदिंडी कार्यक्रमस्थळी दाखल झाली. बालशाहिरांनी पर्यावरण रक्षणावर पोवाडा सादर केला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “मागील दहा वर्षांपासून शहराची लोकसंख्या वाढली. कंपन्या आणि पाण्याचा वापर देखील वाढला. त्यामुळे शहरातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी जाऊ लागले. शहरातील तिन्ही नद्या दूषित आहेत. मागील तीन वर्षांपासून त्यावर प्रभावी उपायोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पवनामाई वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नदी सुधार करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे सुरू आहे. त्यामध्ये नद्यांना पूर्वीच्या स्वच्छ आणि सुंदर नद्या पाहायला मिळतील. नद्यांच्या दोन्ही बाजूंनी बाग आणि अन्य सुविधा करण्यात येतील.

  • इंद्रायणी नदी देखील दूषित झाली आहे. ती नदी आळंदी तीर्थक्षेत्रात जाते, भाविक भक्त त्या नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे नदी सुधारणेवर काम करणे आवश्यक आहे. महापालिका सदैव अशा सामाजिक, पर्यावरण प्रेमी संघटनांसोबत उभी राहील, असेही महापौर जाधव म्हणाले.

वीरेंद्र चित्राव म्हणाले, “पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. एकविसावे शतक हे पर्यावरणीय समस्यांचे असणार आहे. कारण मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. जागतिक तापमानवाढ मानवाच्या घरात दाखल झाले आहे. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारीच नाही तर काळाची गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, सांडपाणी नदीत न सोडणे अशा लहान-लहान गोष्टींमधून पर्यावरण रक्षण करता येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.