Chinchwad : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना फसवण्याची सायबर गुन्हेगारांची नवी टूम

एमपीसी न्यूज – परिस्थितीनुसार गुन्हेगारही आपल्या गुन्हे करण्याच्या पद्धतीत बदल करतात. सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू असून या काळात सर्व बँकांना शासनाकडून बँकेचे ईएमआय स्थगित करण्यास सांगितले आहे. याचाच गैरफायदा घेऊन चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवी टूम शोधली आहे.

 

ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी शेअर करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली जात आहे. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासनाकडून सर्व बँकांना कर्जदारांचे ईएमआय पुढील काही दिवस स्थगित करून त्याची वसुली पुढील काळात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

त्याचाच गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी आता डोके वर काढले आहे. ‘आम्ही बँकेतून बोलत आहे. तुमचा ईएमआय स्थगित करण्यासाठी बँकेकडून एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो ओटीपी आमच्याशी शेअर करा. ज्यामुळे तुमचा ईएमआय स्थगित होईल. अन्यथा तुम्हाला ईएमआय भरावा लागेल.’ असे सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फोन करून सांगितले जाते.

 

नागरिकांनी ओटीपी शेअर केल्यास त्यांच्या बँक खात्यातून तात्काळ रक्कम काढून घेतली जाते.त्यामुळे नागरिकांनी अशा गुन्ह्यांना बळी पडू नये. बँकेकडून कधीही ओटीपी विचारला जात नाही. बँकेबाबतची गोपनीय माहिती कुणाशीही शेअर करू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like