Chinchwad : “तुका आकाशाएवढा”मधून उलगडणार संतत्वाचा जीवनप्रवास

एमपीसी न्यूज – विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होत असंख्य वारकरी आषाढी वारीत सहभागी झाले आहेत. हा भक्तिरसाचा सोहळा स्वरसायली प्रस्तुत “तुका आकाशाएवढा” या स्वरांगण योजनेतील दुसऱ्या पुष्पात रसिकांना अनुभवता येणार आहे. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. १४) होत आहे.

आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणजेच भागवतधर्म. संत शिरोमणी “ज्ञानोबांनी” या इमारतीचा पाया रचला तर या मंगल मंदिरावर कळस चढविला तो संतश्रेष्ठ “तुकोबांनी”. सर्वच संतांनी आपल्या रचनांमधून जनसामान्यांपर्यंत अध्यात्माचे विचार मांडले. या संतांच्या मालिकेत सोप्या नामभक्तिचा महिमा पटवून आपल्या अभंग रचनांमधून सुविचार आणि सदाचाराचा प्रसार केला व भक्तिमार्गाद्वारे समाजात नवचैतन्य निर्माण केले ते “संत तुकाराम महाराजांनी”. तुकोबांच्या संतत्वाचा जीवनप्रवास स्वरसायली प्रस्तुत “तुका आकाशाएवढा” या संगीतमय कार्यक्रमातून उलगडणार आहे. हा कार्यक्रम रविवार (दि. १४ जुलै ) सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होत आहे.

  • या कार्यक्रमाचे निरूपण प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर करणार असून प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री सायली राजहंस-सांभारे हे रचना सादर करणार आहेत. या कलाकारांना मिलींद कुलकर्णी, भरत कामत, अनय गाडगीळ, ओंकार दळवी, आदित्य आपटे हे साथसंगत करणार असून संहिता लेखन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.

कार्यक्रमाविषयी केया हॉलिडेजचे सारंग गोसावी म्हणाले, ‘पिंपरी आणि चिंचवड परिसरातील रसिकांसाठी खूप छान उपक्रम आहे. पहिल्या कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमानिमित्त या परिसरातील रसिकांना प्रसिद्ध कलाकारांना ऐकण्याची संधी मिलाली आहे.’

  • सोनिग्रा ज्वेलर्सचे दिलीप सोनिग्रा म्हणाले, ‘सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमात सहभागी झालो आहे. अशा पद्धतीचे उपक्रम नियमित व्हावेत, जेणे करून रसिकांना त्याचा फायदा होईल. प्रसिद्ध कलाकार या निमित्ताने पिंपरी-चिंचवड परिसरात येतील आणि त्यांच्या सादरीकरणाने रसिकांना चागले सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येतील.’
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.