Chinchwad : ‘ते’ पोलीस उपनिरीक्षक कारवाई न करण्यासाठी नागरिकांकडे करतात हजारोंची मागणी!

राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक समाजातील प्रतिष्ठित समाजसेवकांना, नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे हजारो रुपयांची मागणी करतात. तसेच पैसे न दिल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी देतात, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे. तसेच त्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करत नियंत्रण कक्षात बदली करावी, अशी मागणी देखील आमदार बनसोडे यांनी केली आहे.

आमदार बनसोडे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या आपत्तीजनक परिस्थितीत आकुर्डी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहिर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आर. एस. कुमार यांना ताब्यात घेऊन बेकायदा कारवाई केली.

समाजात प्रतिष्ठा असलेल्या समाजसेवकाला ताब्यात घेऊन बेकायदा उठाबशा, हातात पाटी देऊन फोटो घेणे, धमकवणे, लाचेची मागणी करणे, अन्यथा कारवाई करण्याची धमकी देणे अशी कारवाई उपनिरीक्षक आहिर यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे आणि माजी महापौर आर एस कुमार यांनी आमदार बनसोडे यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना निवेदन देत उपनिरीक्षकाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, ते उपनिरीक्षक स्वतः सोबत दोन खासगी व्यक्ती ठेवत आहेत. त्यांच्या खासगी वाहनांचा वापर करून खासगी व्यक्तींच्या गूगलपे, फोनपे या खात्यावर नागरिकांकडून लाच स्वीकारली जात आहे. या खासगी व्यक्ती पोलीस असल्याची बतावणी करून समाजात दहशत निर्माण करीत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित उपनिरीक्षकाची चौकशी करून त्यांची नियंत्रण कक्षात तात्काळ बदली कारावी अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.

पोलीस उपायुक्त स्मिता पाटील म्हणाल्या, “पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. मनुष्यबळ कमी असूनही काम उत्तमरीत्या सुरू आहे. त्यातूनही असा काही प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी होईल. वरिष्ठ अधिकारी त्याबाबत योग्य निर्णय घेऊन योग्य त्या सूचना देतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.