Chinchwad : विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कार्यालय तोडफोडप्रकरणी तिसरा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कार्यालय तोडफोडप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिस-या आरोपीला अटक केली. यापूर्वी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली. गुन्ह्यातील एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.

मुकेश प्रल्हाद कांबळे (वय 19, रा. बोपोडी) असे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी देवेंद्र रामलाल बीडलानी (20, रा. आंबेडकर चौक, औंध) आणि सॅमसन सुलेमान अँमेन्ट (20, कमान फॅक्ट्री, खडकी) या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारी सातजणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलिसांसोबत या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत आहे.

पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी केएसबी चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे समोर आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. यापूर्वी अटक केलेल्या देवेंद्र आणि सॅमसन या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, गणेश सावंत, सचिन उगले, विशाल भोईर, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.

हल्ला राजकीय षडयंत्रातून नसून प्रेमप्रकरणातून
दरम्यान, सुरुवातील अटक केलेल्या दोन आरोपींकडे चौकशी सुरु असताना त्यांनी हा प्रकार कोणत्याही राजकीय षडयंत्रातून केला नसून प्रेमप्रकरणातून केला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपींच्या मित्राच्या बहिणीचे आणि दत्ता साने यांच्यासोबत असणाऱ्या एका तरुणाचे प्रेमसंबंध आहेत. मात्र, आरोपींच्या मित्राला हे संबंध मान्य नसल्याने त्यांनी हा हल्ला घडवून आणला. या धक्कादायक कबुलीमुळे या प्रकरणाला वेगेळे वळण लागले आहे. तरी देखील आरोपींच्या कबुलीवर पूर्ण विश्वास न ठेवता पोलीस इतर शक्यताही पडताळून पाहत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.