Chinchwad : मोरया गोसावी मंदिर परिसरातील पूजा साहित्याच्या दुकानात चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिर परिसरातील आठ पूजा साहित्याच्या दुकानातून तांब्या-पितळेच्या मूर्ती आणि वस्तू चोरून नेणा-या तीन चोरट्यांना पोलिसांनी पकडले. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्यांकडून 87 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सोमनाथ संजय खरात (वय 18, रा. चिंचवड) आणि सलीम कालू शेख (रा. वेळातनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोरया गोसावी मंदिर परिसरात सचिन छाजेड यांचे स्वानंद जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. सचिन यांच्या दुकानातून आणि आजूबाजूच्या अन्य सात दुकानांमधून चोरट्यांनी तांबे, पितळ व पांढऱ्या धातूच्या मुर्त्या, वस्तू व रोख रक्कम असा एकूण एकूण 89 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 11 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला.

डॉ. हेमंत यांचा केशवनगर चिंचवड येथे राजदेवता अपार्टमेंटमध्ये साई क्लीनिक नावाचा दवाखाना आहे. 14 ते 15 ऑगस्ट दरम्यान डॉ. हेमंत यांचा दवाखाना कुलूप लाऊन बंद असताना चोरट्यांनी दवाखान्याचे शटर उचकटून आतील 35 हजार रुपये किमतीचा आयपॅड टॅब चोरून नेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस करीत होते.

चिंचवड स्टेशन चौकात एक इसम मूर्तींची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मूर्तींबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या एका लपवयीन साथीदारासोबत मिळून वरील दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले.

चोरी केलेला ऐवज दोघांनी मिळून तिसरा साथीदार सलीम शेख याच्या घरी ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार सलीम याला अटक करून तिघांकडून 52 हजार 30 रुपये किमतीच्या तांबे, पितळी धातूच्या मूर्ती, समई, पूजा ताट आणि ३५ हजार रुपये किमतीचा टॅब असा एकूण 87 हजार 30 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप चौधरी, संजय पंदरे, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, वसंत खोमणे, कापसे, मुंडे, सानप, राऊत, हिवाळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.