Chinchwad : ‘त्या’ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर

पिंपरी चिंचवड शहरातील 22 गुन्ह्यातील सुमारे 47 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज – ज्या तपासी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्या सर्वांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी जाहीर केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण 22 गुन्ह्यातील 47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आला.

कार्यक्रमासाठी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आणि 28 फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “ज्या तपासी अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्या सर्वांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यक्त येणार आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आम्हाला काम करण्यास प्रेरणा देते. गुन्हे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. संशयित ठिकाणी जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. त्यासाठी पोलिसांनी विविध संस्थांच्या मदतीने यासाठी पुढाकार घ्यावा. कोट्यवधीच्या संपत्तीसाठी एखादा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची तसदी देखील काही लोक घेत नाहीत. ही खेदाची बाब आहे.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षा अबाधित करणे गरजेचे आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गुंतवणूक करावी. डिटेक्शनवर पोलिसांनी जोर द्यावा. त्यात टीमवर्क केल्यास यश मिळेल. गुन्हे वाढण्याचे ऐकायला वारंवार मिळते, पण त्याबाबत खबरदारी किती नागरिक घेतात हे मात्र, ऐकायला मिळत नाही. गुन्हे दाखल होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसते, पण योग्य डिटेक्शन झाले तर यावर अंमल आणता येईल. सर्व अधिका-यांनी यावर काम करावे. दर तीन महिन्यांनी रिकव्हर केलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम होईल, असेही बिष्णोई म्हणाले.

आपला मुद्देमाल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. फिर्यादी दत्तात्रय चिंचवडे (चिंचवड) यांनी पोलिसांनी त्यांना खूप मदत केल्याचे सांगितले.’ तर हेमंत मिश्रा (निगडी) यांनी ‘कॉल केल्यावर पोलीस 15 मिनिटात पोहोचतात, हे मी अनुभवले. पोलिसांनी मॉरल सपोर्ट केला आणि माझा मुद्देमाल मिळवून दिल्याचे सांगितले.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, “पोलीस स्थापना दिवस प्रथमच आयुक्तालयात साजरा केला जात आहे. यानिमित्त सप्ताहाचे आयोज करण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांशी विविध माध्यमातून संपर्क केला जात आहे. मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम त्या अंतर्गत घेण्यात आला आहे.”

सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले. प्रास्ताविक पोकिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.