Chinchwad : महिला सहाय्यता कक्षाकडे वर्षभरात साडेतीनशे तक्रारी!; केवळ 299 तक्रारींचा निपटारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महिला सहाय्यता कक्षाकडे मागील वर्षभरात 351 तक्रारी अर्ज आले आहेत. त्यातील 299 तक्रारींचा या कक्षाकडून निपटारा करण्यात आला आहे. त्यामध्ये 107 तक्रारदारांच्या तक्रारींचे समुपदेशनातून संसार बसवण्यात महिला सहाय्यता कक्षाला यश आले आहे.

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नोव्हेंबर 2018 मध्ये महिला सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीने तक्रारदारांच्या समस्यांवर संबंधित समुपदेशन केंद्राकडून समुपदेशन केले जाते. त्यामध्ये तक्रारदार महिलेला व तिच्यावर अन्याय करणा-यांना समजावून सांगितले जाते. तक्रारी अर्ज करणा-यामध्ये विवाहित महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनातून महिलांचे संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी महिला सहाय्यता कक्षाकडून विशेष प्रयत्न केले जातात.

विवाहितेच्या छळाबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापूर्वी महिला सहाय्यता कक्षाकडून महिलेला समुपदेशन केले जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्हीकडील लोकांना नाहक त्रास होतो. न्यायालयाच्या पाय-या झिजवाव्या लागतात. तसेच नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण होते. प्रसंगी नात्यांना तिलांजली देखील दिली जाते. त्यामुळे समुपचाराने मार्ग काढण्यासाठी महिला सहाय्यता कक्षाकडून मदत केली जाते.

जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील महिला सहाय्यता कक्षाकडे 351 तक्रारी अर्ज आले आहेत. त्यातील 103 तक्रारदारांच्या समस्या सामोपचाराने सोडविण्यात आल्या आहेत. समुपदेशानंतरही 106 जणांनी पोलीस ठाण्यात तर 90 जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

  • महिला सहाय्यता कक्षाकडे आलेले तक्रारी अर्ज –
    जानेवारी – 13
    फेब्रुवारी – 12
    मार्च – 13
    एप्रिल – 17
    मे – 23
    जून – 36
    जुलै – 49
    ऑगस्ट – 41
    सप्टेंबर – 40
    ऑक्टोबर – 35
    नोव्हेंबर – 36
    डिसेंबर – 36

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.