Chinchwad : धनलाभ करून देणारी राईस पुलिंग मशीन विक्रीच्या बहाण्याने कोट्यवधींची फसवणूक करणा-या टोळीप्रमुखासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – राईस पुलिंग मशीनद्वारे चमत्कारी पद्धतीने धनलाभ होतो. ती मशीन विकण्याच्या बहाण्याने नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन आणि बेंगलोर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रावेत येथे केली.

सिद्धेश्वर विष्णू सोनकांबळे (वय 44, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. शिरवळ, जि. सोलापूर), बालाजी बसंतराव जानाते (वय 27, रा. चिंचवडेनगर. मूळ रा. केदारगुंठा, जि. नांदेड), अमित अरुण केदारी (वय 32, रा. पवारवस्ती, बोपोडी. मूळ रा. कवडी पिंपळगाव, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चमत्कारी धनलाभ करून देणारी राईस पुलिंग मशीन विक्री करण्याच्या बहाण्याने नागरिकांना फसवल्याप्रकरणी बेंगलोर शहरातील कोडीगेहल्ली पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना बेंगलोर पोलिसांचे पोलीस निरीक्षक श्रीधर पुजार यांचे एक पथक पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. बेंगलोर पोलिसांकडून माहिती घेऊन पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार त्याच्या साथीदारांसोबत रावेत येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून एका कारमधून जाणा-या संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये मुख्य सूत्रधार सोनकांबळे आणि त्याचे दोन साथीदार जानते आणि केदारगुंठा आढळून आले. तिघांनाही अटक करून पुढील तपासासाठी बेंगलोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, चेतन मुंढे, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2
You might also like