Chinchwad: पहिल्या पत्नीला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिल्या पत्नीसह मुलांचा सांभाळ न करता एकाने दुसरं लग्न केले. तसेच पहिल्या पत्नीस मारहाण करून तिचा छळ केला. याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेतली.

चिंचवडच्या वेता़ळनगरमधील एका 26 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती आफताब अहमद शेख (वय अंदाजे 35), सासू रेहाना अहमद शेख (वय 65, दोघे रा. 645, फेमस बेकरीजवळ, नाना पेठ, पुणे) आणि नणंद आसमा इशाद शेख (वय 29, रा. नाना पेठ, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मानसिक त्रास, मारहाण, वारंवार पैशांची मागणी केल्याचा आरोप केला. तसेच पतीने न सांगता दुसरे लग्न केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे आपल्या परिवाराच्या जीवितास धोका असल्याचेही पीडित महिलेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पीडित महिलेचे 28 डिसेंबर 2008 रोजी आफताब शेख याच्याशी लग्न झाले. काही दिवसानंतर तो पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. लग्नात आपल्या आईने घातलेले दागिने पतीने (नवऱ्याने) काढून घेतले आणि माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. हलाखीची परिस्थिती असतानाही पीडित महिलेच्या दोन्ही बाळंतपणांचा खर्च देखील तिच्या आईने केला. त्यानंतरही आफताब पैशाची मागणी करून मानसिक त्रास देत होता. त्याने पीडित महिलेला माहेरी आईकडे सोडून दिले.

गेली सात वर्षे पीडित महिला तिच्या दोन मुलांसह आईकडे राहात आहे. मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिचा पती घेत नाही. एका मॉलमध्ये सेल्स गर्ल्स म्हणून नोकरी करून ती चौघांचा उदरनिर्वाह चालवत आहे, असे पिडीताने तक्रारीत म्हटले आहे.

सासू, नणंद तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांशी संगनमत करून तिच्या पतीने परस्पर दुसरे लग्न केले. तसेच पीडित महिलेला आणि तिच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. चिंचवड पोलीस ठाणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वारंवार खेटे घालूनही दखल घेतली जात नव्हती.

पीडित महिलेने माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली. नाईक यांनीही सुमारे महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.