Chinchwad : एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या तीन सराईत चोरट्यांना अटक; ‘गुन्हे शाखा युनिट पाच’ची कारवाई

आरोपींकडून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या तीन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. हे आरोपी मागील एक वर्षांपासून फरार होते. तर दोघांवर वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर दशरथ शिंदे (वय 20), अनिल ऊर्फ अँडी रामदास देवरे (वय 20) आणि तुषार मच्छिन्द्र शेगर (वय 19, तिघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर 2018 रोजी आकुर्डी प्राधिकरण येथे राहणारे दोन विद्यार्थी रात्री जेवणानंतर शतपावली करीत होते. त्यावेळी दोघांवर आरोपींनी कोयत्याने वार करून मोबाईल चोरून नेले. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस देखील या गुन्ह्याचा तपास करत होते. बुधवारी (दि. 4) पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, तीन इसम मोपेड दुचाकीवर किवळे बसस्टॉपवर येणार असून ते चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपी दुचाकीवरून पळून जात असताना पोलिसांनी शिताफीने पकडले.

आरोपींकडून मोपेड दुचाकी, चार मोबाईल फोन असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी मागील एक वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होते. तर आरोपी ज्ञानेश्वर आणि अनिल या दोघांवर वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात जमाव जमवून दहशत माजवणे, हत्यार बाळगणे, हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना देहूरोड पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी फारुख मुल्ला, मयूर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार ईघारे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, दयानंद खेडकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.