Chinchwad : लोकशाही व संविधान टिकविण्यासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची- राही भिडे

एमपीसी न्यूज- संसदीय लोकशाहीबद्दल बाबासाहेबांनी देखील चिंता व्यक्त केली होती ती गोष्ट आता खरी ठरत असून सर्वांनी लोकशाही व संविधान टिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी आज येथे व्यक्त केले.

चिंचवडच्या शाहूनगर येथे पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित संविधानपर व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफताना ‘भारतीयसंविधान आणि राजकीय संहिता’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. लक्ष्मण रानवडे होते. यावेळी साहित्यिक प्रभाकरओव्हाळ, महिला व बालविकास खात्याचे राहुलमोरे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सुरेश कसबे आदी उपस्थित होते.

राही भिडे पुढे म्हणाल्या, ” देशातील विविधतेला एका धाग्यात बांधून ठेवण्याचे सामर्थ्य संविधानात आहे. ते नको असल्यामुळे जातीयता पोसली जात आहे. विषमतामूलक समाजव्यवस्थेत राज्यघटना शाबूत राहिल्यास देश व या देशातील एकात्मता टिकून राहील, अन्यथा देशात अराजकता माजेल. मात्र, संविधानाचा पाया नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने देशातील नागरिक म्हणून सर्वांनी जागरूक होणे गरजेचे आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड. रानवडे म्हणाले की, खंडप्राय देशातील 14 प्रमुख भाषा व शेकडो बोलीभाषा बोलणाऱ्या साडेपाच हजार जातींना एकत्र बांधून ठेवण्याची ताकद संविधानात आहे. त्यामुळे संविधान हे या देशातील सर्व जातीपंथाच्या लोकांचा पवित्र ग्रंथच झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

रतन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कैलास लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. विजय जगताप, प्रवीण गायकवाड, विष्णू मांजरे, विजय गेडाम, राहुल आंबोरे, राजू उबाळे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.