Chinchwad : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून दोन आठवड्यात सव्वा दहा लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन आठवड्यात ड्रंक अँड ड्राइव्ह, रॉंग साईड, ओव्हर स्पीड, टेन्टेड ग्लास या चार प्रकारांमध्ये तीन हजार 436 खटले दाखल करून त्यामध्ये 10 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने एक फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (रॉंग साईड), वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगात वाहन चालवणे (ओव्हर स्पीड), वाहनांना काळ्या काचा लावणे (टेंटेड ग्लास) या चार प्रकारांवर विशेष भर देण्यात आला.

ड्रंक अँड ड्राइव्ह करणा-या 195 वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ही सर्व प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. रॉंग साईडने वाहन चालवणा-या एक हजार 358 वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्यावर एक लाख 35 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हर स्पीडने वाहन चालवणा-या 642 जणांना सहा लाख 47 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहनांना काळ्या काचा लावलेल्या एक हजार 241 वाहनांवर कारवाई करून तात्काळ काळ्या काचांचे फिल्मिंग काढण्यात आले. तसेच त्या वाहन चालकांना दोन लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.