Chinchwad: तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी नताशा निवडणुकीच्या रिंगणात

एमपीसी न्यूज – तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नितीश (नताशा) लोखंडे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढविणार आहे. जनहित लोकशाही पार्टीतर्फे त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार) म्हणाल्या, ” आम्हा एलजीबीटींना घटनेतील 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे या प्रगल्भ लोकशाही राष्ट्रात स्वतंत्र दर्जा मिळाला. 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे एलजीबीटींना (एल – लेस्बियन, जी – गे, बी – बाय सेक्स्यूयल, टी – ट्रान्स जेंडर) हक्क मिळाले. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. अजूनही आम्हाला आमचे न्याय, हक्क मिळविण्यासाठी झगडावेच लागत आहे”

यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेत खाते उघडणे, नवीन वाहन घेणे, घर घेणे, पासबूक, कर्ज मिळविणे, चरितार्थासाठी उद्योग व्यवसाय सुरु करणे यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाच्या विकासाच्या अनेक योजना आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचल्या नाहीत.

आयुष्यभर समाजाचे टक्के, टोणपे सोसत उतारवयात, अपंगत्व आल्यानंतर आम्हाला भेडसावणा-या सामाजिक व आरोग्याच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. यातून तृतीय पंथीयांची सुटका व्हावी म्हणून एलजीबीटींचे प्रश्न सक्षमपणे समाजापुढे मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निवडणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता आम्हाला सहानुभूती नको तर समाज दर्जा मिळावा यासाठी आमचा हा लढा आहे, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.