Chinchwad : संचारबंदीमध्येही वाहन चोरी जोमात; संभाजीनगर, इंदोरीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असतानाही चोरट्यांचे प्रताप थांबण्याचे नाव घेत नाहीत. घरफोडी, एटीएम फोडी आणि वाहन चोरीच्या घटना या काळातही घडतच आहेत. रविवारी (दि. 5) निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 21 मार्च रोजी घडली. शरीफ मोहम्मदीन अन्सारी (वय 40, रा. समर्थनगर, आळंदीरोड, दिघी) यांनी रविवारी (दि. 5) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी चार वाजताच्या दरम्यान फिर्यादी अन्सारी यांनी आपली 20 हजार रुपये किंमतीची एम एच 12 / एम टी 9673 ही दुचाकी बर्ड व्हॅली गार्डनसमोर पार्क केली होती. मात्र ती दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना मावळ तालुक्यातील इंदोरी येथे 4 एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली. रमेश महादू ठाकर (वय 45, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकर यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई आर 5928 ही दुचाकी घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.