BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या; सायबर सेलची कारवाई

एमपीसी न्यूज – एका कंपनीचा पुण्यात विस्तार होणार असून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. अशी बतावणी करून तरुणाला कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची दोन लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पिंपरी-चिंचवड सायबर सेलने केली.

पियुष सुरेश दुबे (वय 25, रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), कुणालकुमार मनोहर नखाते (वय 27, रा. सारणी बेतुल, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल विजय तिरपुडे (वय 27) यांनी फिर्याद दिली.

  • पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापूर्वी अमोल यांना त्यांचे मध्यप्रदेश येथे राहणारे मित्र सुशील पाटील यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की क्यू-नेट कंपनीचा पुण्याचा विस्तार होणार आहे. तू त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेस का? यासाठी अमोल यांनी संमती दर्शवली असता, फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपींनी चतुशृंगी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मिटिंग घेतली. त्यामध्ये कंपनीत एकूण तीन लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. त्यातील दीड लाख सुरुवातीला गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार अमोल यांनी तात्काळ पियुष दुबे याच्याकडे दीड लाख रुपये दिले. त्यानंतर सुशील पाटील याने फोन करून आणखी एक लाख रुपये भरण्यास सांगितले.

अमोल यांनी बँकेतून कर्ज काढून 70 हजार रुपये भरले. मात्र, एवढ्या रकमेवर ज्यादा फायदा होणार नसल्याचे सुशीलने पुन्हा सांगितले. त्यामुळे अमोल यांनी पुन्हा पंधरा हजार रुपये भरले, असे एकूण दोन लाख 35 हजार रुपये अमोल यांनी आरोपींकडे दिले.

  • पैसे देऊनही कोणत्याही प्रकारचा मोबदला न दिल्याने अमोल यांनी पोलिसात धाव घेत हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना या प्रकरणातील आरोपी येरवडा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पियुष आणि कुणालकुमार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडके, महिला पोलिस उपनिरीक्षक, स्वाती लामखडे, अतुल लोखंडे, पोपट हुलगे, भास्कर भारती, मनोज राठोड, नितेश बिच्चेवार, प्रदीप गायकवाड, कौंतेय खराडे, नाजुका हुलवळे, आशा सानप, वैशाली बर्गे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

.