Chinchwad: रिक्षा भाडे देताना ई-वॉलेटचा वापर करा; रिक्षा चालक आणि नागरिकांना आवाहन

Chinchwad: Use e-wallet when renting rickshaws; rto and traffic police Appeal to rickshaw drivers and citizens

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. रिक्षाने प्रवास करताना भाड्याचे पैसे देण्यासाठी नागरिकांनी आणि स्वीकारण्यासाठी रिक्षा चालकांनी ई-वॉलेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड आणि महापालिका यांच्या वतीने शुक्रवारी (दि.5) पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालकांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सुरक्षा साधनांच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव, पोलीस निरीक्षक (प्रशासन) प्रसाद गोकुळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रिक्षा चालकांना मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, होमिओपॅथी औषधी, आर्सेनिक अल्बम 30 आणि साबण आदींचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात रिक्षांमध्ये प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पारदर्शक पडदा बसविण्यात आला.

कार्यक्रमात प्रशासनाकडून रिक्षा चालकांना खालील आवाहने करण्यात आली –

* कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये अंतर ठेवण्यासाठी पारदर्शक पडदा बसवणे प्रत्येक रिक्षा चालकांसाठी आवश्यक आहे.

* प्रत्येक रिक्षा चालकाने मास्क वापरावा.

* विनामास्क प्रवाशांना रिक्षा बसवू नये.

* रिक्षामध्ये सॅनिटायझरची बाटली ठेवावी.

* रिक्षा भाडे स्वीकारताना सोशल डिस्टन्स पाळावे तसेच त्यानंतर लगेच हात सॅनिटाईझ करावेत अथवा साबणाने सुवावेत.

* रिक्षा चालकांप्रमाणेच प्रवाशांची देखील तेवढीच जबाबदारी असून प्रवाशांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्स पाळावे.

* रिक्षा भाडे देताना ई-वॉलेटचा वापर करावा.

* प्रवासी व रिक्षा चालक यांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.