Chinchwad : वेताळनगरमध्ये टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेताळ नगर परिसरात टोळक्याने वर्चस्ववादातून तलवारी, कोयते घेऊन तुफान राडा केला. तसेच वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री घडली.

स्वानंद चंद्रकांत कांबळे (वय 20, रा. वेताळनगर, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आण्णा ऊर्फ ओंकार हजारे, ओंकार कसबे, मल्हारी दभडगे, आदित्य फाळके, लखन डोंगरे, भैय्या उर्फ तेजस वायदंडे व इतर दोन ते तीनजण (सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हातात तलवारी, कोयते घेऊन तसेच दगडफेक करत सुमारे नऊ ते दहा गुंडांनी चिंचवड गावातील वेताळनगर परिसरात वाहनांची तोडफोड केली. दुचाकी, रिक्षा, मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. कुख्यात गुंड रणजीत चव्हाण गँग आणि मामा गँग यांच्या वर्चस्व वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी परिसरातील नागरिक रस्त्यावर आले होते. ‘आमचे नुकसान भरून द्या, आरोपींना त्वरित अटक करा’ अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली. पोलीस आयुक्तालयापासून अगदी जवळच असलेल्या वेताळनगरमध्ये हा प्रकार घडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III