Chinchwad: कोरोनामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील वासंतिक सत्र रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीच्या समन्वयातून वासंतिक सत्राचे आयोजन हे शहराच्या विविध भागात एप्रिल आणि मे महिन्यात केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचे मोठे संकट देशासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात होणारे वासंतिक सत्र रद्द करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी दिली.

दरवर्षी शहरभर विविध व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येते. वर्षभर चालणार्‍या व्याख्यानमालांमधून विविध विषयांवर विचारमंथन करण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्ते या ज्ञानयज्ञातून आपली हजेरी लावतात. शहरात व्याख्यानमाला अनेक वर्षांपासून सुरू आहेत. समितीच्या समन्वयाचे हे विसावे वर्ष आहे. वासंतिक सत्राचे आयोजन हे शहराच्या विविध भागात एप्रिल आणि मे महिन्यात सलग दीड महिने केले जाते.

 

जिजाऊ व्याख्यानमाला गांधी पेठ चिंचवड, फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमला मोहननगर, छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला निगडी, सुबोध व्याख्यानमाला काळभोरनगर, जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला प्राधिकरण, माऊली व्याख्यानमाला आकुर्डी, महात्मा गांधी व्याख्यानमाला मोरवाडी, अशा काही व्याख्यानमालांचे आयोजन वासंतिक सत्रादरम्यान केले जाते.

यावर्षी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेता हे संपूर्ण सत्र रद्द करण्यात येत आहे. सहभागी सर्व मंडळांनी आणि शहरभर वास्तव्य करणार्‍या श्रोत्यांनी आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी घेत कोरोनाच्या संकटातून मुक्त व्हावे. तसेच वेळोवेळी येणार्‍या शासकीय आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.