Chinchwad : विनोद कवितेतून निर्माण करणे ही अवघड कला – बंडा जोशी

एमपीसी न्यूज – शरीर आणि मन यांना आनंद मिळवून देण्याचे काम विनोद निर्मितीतून करता येते. विनोद करणे ही अवघड गोष्ट आहे; आणि तो विनोद कवितेतून करणे ही तर अवघड कला आहे, असे मत ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात रविवारी (दि. १९ मे) ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्या व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प हास्यकवी बंडा जोशी यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते.

  • कविवर्य बंडा जोशी, अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी ‘हास्यमैफील’ या कार्यक्रमांतर्गत विनोदी कविता, विडंबने, किस्से उद्धृत करीत व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्पाची गुंफण केली. नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा उषा गर्भे, कार्यवाह रमेश डोंगरे, सहकार्यवाह चंद्रकांत कोष्टी, कोषाध्यक्ष रमेश इनामदार, सहकोषाध्यक्ष नारायण दिवेकर आदी उपस्थित होते.

‘हास्यमैफील’चा प्रारंभ करताना बंडा जोशी यांनी, “माणसे हल्ली हसणे विसरली असून विनाकारण ताणतणाव बाळगत चेहऱ्यावर गंभीर भाव घेऊन वावरत असतात. वास्तविक माणसाकडे विनोदबुद्धी असली तर त्याचे जगणे सुखकर होते!” असे सांगून लग्नाचे प्रकार, प्रेम करण्याच्या अजब तऱ्हा, प्रेमात पडलेल्या कवीच्या विक्षिप्त कविता, प्रेयसीचा कर्दनकाळ बाप यांचे किस्से कथन करताना लोकप्रिय हिंदी-मराठी चित्रपटगीतांची विडंबने सादर करून वातावरण निर्मिती केली.

  • ‘कपड्यांच्या निवडीबाबत महिलांना खूप वाव असून पुरुषांवर नेहमी अन्याय होतो’ असे म्हणत त्यांनी, “एक तागा सुटाचा…शंभर कपडे स्त्रियांचे!”या भावगीत विडंबनातून रसिकांना हसवले. मोबाईलचे वेड कशा गंमती-जमती घडवून आणते. ते आपल्या ‘मोबाईलचं याड लागलंय…’ या कवितेतून मांडून रसिकांची दाद मिळवली. सुरेलपणे पारंपरिक पाळणा सादर करीत बंडा जोशी यांनी राजकारण, समाजकारण आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर चपखलपणे भाष्य केले.

त्यानंतर अनिल दीक्षित यांनी, “खळखळून हसणं आणि क्षमाशील असणं या दोन गोष्टींतून माणूसपण सिद्ध होतं, असे मत व्यक्त करून ‘नोटाबंदी’ या आपल्या लोकप्रिय कवितेने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. बँकेवर डल्ला मारणाऱ्या नीरव मोदी या महाभागावर,”मोदीबाबा, मोदीबाबा भागलास का?” या चांदोमामाच्या बालगीताचे विडंबन रसिकांना भावले; तर पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरील लावणीला पसंतीची दाद मिळाली. नारायण सुर्वे यांच्या ‘असं पत्रात लिवा…’ या कवितेच्या संकल्पनेवरील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे पत्रलेखन हे संबंधितांचे बिंग फोडणारे असल्याने श्रोत्यांकडून हशा आणि टाळ्या मिळाल्या.

  • “उत्स्फूर्त दाद देणं हे रसिकतेचं लक्षण आहे” असे भाष्य करीत भालचंद्र कोळपकर यांनी महाविद्यालयीन असफल प्रेमाचे किस्से, लग्नासाठी वधू संशोधन, वधू परीक्षा यावरचे विनोद सांगून “लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशीच करायचे… नाहीतर रामदेवबाबांसारखी योगासने करीत जगभर फिरायचे!” हे खूळ मनाशी घेऊन सिनेनट्यांचा पुरवलेला पिच्छा कवितेतून मांडून दाद मिळवली. खेड्यातील अडाणी बायकोचे पाक कौशल्य, इरसाल बायकांचे नमुने, संसारात नवरा- बायकोच्या भांडणाचे महत्त्व सांगताना देवालादेखील मनासारखी बायको मिळत नाही. या कोळपकरांच्या कवितेतील निष्कर्षाने रसिकांना मनमुराद हसवले.

वासंतिक व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शनिवारी (दि. १८ मे २०१९ रोजी) ‘त्रिदल’ या कार्यक्रमांतर्गत पु.ल., गदिमा आणि सुधीर फडके या त्रयीच्या साहित्यिक- सांस्कृतिक कारकिर्दीवर ज्योती कानिटकर, पुष्पा नगरकर, माधुरी ओक, उषा इनामदार आणि मनीषा मुळे यांनी सादरीकरण करून गुंफले.

  • उषा गर्भे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मुरडे यांनी खुसखुशीत शैलीत कवींचा परिचय करून दिला. जयमाला विभुते, गोपाळ भसे, अरुण घोलप, सुदाम गुरव, प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. रमेश डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.