Chinchwad : व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडिओ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नाही; घाबरण्याचे कारण नाही

पुणे, पिंपरी चिंचवड पोलिसांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडिओ इस्लामपूर, सांगली येथील असल्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलीस जीप दिसत आहे. तसेच पोलीस एक अनाऊन्समेंट करीत आहेत, ‘उद्यापासून तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन आहे. या कालावधीत दूध विक्री ठराविक कालावधीत होईल. तसेच अन्य दुकाने पूर्णपणे बंद राहतील.’ मात्र, तो व्हिडिओ पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी हा व्हिडीओ सांगलीचा आहे, पुण्याचा नाही असे सांगितले. तर पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी देखील हा व्हिडिओ इस्लामपूर, सांगली येथील असण्याची शक्यता वर्तवली आहे.

सध्या पुणे जिल्ह्यात संचारबंदी (कलम 144 (1) (3)) याव्यतिरिक्त अन्य कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. या आदेशामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंची दुकाने सुरू राहणार असून नागरिकांना या वस्तू खरेदी करता येणार आल्याचेही सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.