Chinchwad: भगवत गीतेचे गाढे अभ्यासक व अध्यात्मिक अधिकारी विनायक फडके यांचे निधन

Chinchwad: Vinayak Phadke, a keen student of Bhagwat Gita and a spiritual Teacher, passed away विनायक फडके यांनी वयाच्या 85 व्या वर्षी गीतातत्व दर्शन खंड एक व खंड दोन हे दोन ग्रंथ लिहिले होते. सनातन संस्थेच्या वतीने त्यांना 2014 मध्ये 'संत' म्हणून घोषित करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील भगवत गीतेचे गाढे अभ्यासक, लेखक, मंत्रविद्या, आयुर्वेद, ज्योतिष या विषयातील तज्ज्ञ व अध्यात्मिक अधिकारी विनायक पुरुषोत्तम फडके (वय 86) यांचे गुरुवारी (11 जून) वृद्धापकाळाने निधन झाले. 

त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, सून, दोन मुली, दोन जावई आणि चार नातवंडे असा परिवार आहे.

विनायक फडके हे गेल्या चार महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर चिंचवड येथील निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विनायक फडके हे मारुतिरायांचे निस्सीम उपासक वसंत पोंक्षेकाका यांची गादी चालवत होते. विनायक फडके यांनी अध्यात्माविषयी विपुल ग्रंथलेखनही केले होते. त्यांच्याविषयी अनेकांना अनुभूतीही आल्या होत्या. ते सनातन संस्थेशी संबंधित होते. चिंचवड परिसरात होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांना उपस्थित राहून ते मार्गदर्शन करीत असत.  सनातन संस्थेच्या वतीने त्यांना 2014 मध्ये ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले होते. अध्यात्मिक गुरू स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

वयाच्या 85 व्या वर्षी लिहिले दोन ग्रंथ

शरीराला वार्धक्य येऊ शकते, पण इच्छाशक्तीला कधीच नाही. विनायक फडके यांनी वयाच्या 85 व्या वर्षी गीतातत्व दर्शन खंड एक व खंड दोन हे दोन ग्रंथ लिहून याचीच प्रचिती दिली होती. त्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते फडके यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला होता. फडके यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  ग्रंथालय भारती नागपूर, पुणे मराठी ग्रंथालय आदी नामांकित संस्थांच्या पुरस्कारांचाही समावेश आहे.

विनायक फडके यांनी लिहिलेली सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात मराठी दासबोध, सार्थ आत्माराम, ज्ञानेश्वरी, आरोग्यासाठी मंत्र, आरोग्यदायी दिनचर्या अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे. गीतातत्वदर्शन खंड एक व खंड दोन यामध्ये पाच ग्रंथ एकत्र करुन खंड लिहिले आहेत. त्यात  भगवतगीता श्लोक , श्लोकाचा अर्थ, अभंग ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीतील टीका आदींचा अभ्यास करुन तो ग्रंथांमध्ये मांडला आहे. 2006 पासून विविध विषयावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.