Chinchwad: मताधिक्य घटले, लक्ष्मण जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा, मतांमुळे विरोधकांना उर्जा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असतानाही लक्ष्मण जगताप यांचे मताधिक्य घटले आहे. लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा असताना केवळ 38 हजारांवर समाधान मानावे लागले. जगताप यांना विचार करायला लावणारे मताधिक्य असून त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. तर, अपक्ष लढलेल्या राहुल कलाटे यांनी तब्बल एक लाख 12 हजार मते मिळविली. चिंचवडमधील विरोधकांना ही मते उर्जा देणारी आहेत.

चिंचवड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महापालिकेत चिंचवडमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. शिवसेना देखील भाजपसोबत होती. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना चिंचवड मतदारसंघातून 96 हजार 758 मताधिक्य होते. मात्र, सहा महिन्यातच शिवसेना-भाजप युती ते मताधिक्य राखू शकली नाही. भाजपचे लक्ष्मण जगताप यांना केवळ 38 हजार 498 मताधिक्य मिळाले आहे. एक लाख ते सव्वा लाखाचे मताधिक्य मिळण्याचे भाजप-शिवसेने नेत्यांचे दावे विरोधकांनी फोल ठरविले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. त्यातच शिवसेना देखील भाजपच्या प्रचारात सक्रिय झाली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे विरोधक सपशेल अपयशी ठरतील असे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या राहुल कलाटे यांनी जगताप यांना घाम फोडला. टफ-फाईट दिली. कलाटे यांनी तब्बल एक लाख 12 हजार मते घेतली. ही मते विरोधकांना उर्जा देणारी ठरणारी आहेत.

जगताप यांचे मताधिक्य कमी होण्याची ‘ही’ आहेत कारणे!
चिंचवड मतदारसंघात अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात आहे. अवैध बांधकामे नियमित झाली नाहीत. शास्तीकराचा प्रश्न 100 टक्के निकालात निघाला नाही. प्रस्तावित रिंगरोडमुळे सुमारे तीन हजार कुटुंबे बेघर होणार आहेत. नागरिकांचा रिंगरोडला विरोध आहे. वाकड, पिंपळेनिलख भागात पाण्याची समस्या कायम आहे. त्याचबरोबर अनेक नगरसेवक नाराज आहेत. महापालिकेतील गैरकारभार त्याचा देखील जगताप यांना फटका बसला असल्यानेच मताधिक्य घटल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.