Chinchwad : ‘ते’ सध्या काय करतात? वर्षभरात तीन फरारी आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश

5 कैदी रजेवर आल्यावर तुरुंगात परतलेच नाहीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 आरोपी मागील काही वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्या आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तर, शहराच्या हद्दीत राहणारे पाच कैदी तुरुंगातून सुट्टीवर आल्यावर तुरुंगात परतलेच नाहीत. त्यामुळे ‘ते’ सध्या काय करतात? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. मागील वर्षभरात केवळ तीन फरारी आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनीत बाळकृष्ण नायडू, दीपक दत्तू थेऊरकर, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक रामचंद्र चावरिया, जितेंद्र तानाजी माने, आणि निगडीच्या हद्दीतील सुनील अनंत शिंदे हे पाच कैदी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत. यातील नायडू हा अभिवचन (फर्लो) रजेवर तर, इतर चौघे संचित (पॅरोल) रजेवर बाहेर आले होते. मात्र, ते पुन्हा कारावासात गेलेच नाहीत. पिंपरी-चिंचवडमधील या पाच कैद्यांना आता बंदी फरारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

  • अपर पोलीस महासंचालक कार्यालय तसेच कारागृह प्रशासन यांच्याकडून राज्यातील बंदी फरारी कैद्यांच्या अटकेसाठी पाठपुरावा सुरु असतो. शहरामध्ये गुन्हे शाखा तसेच इतर गोपनीय विभाग गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन असतात. मात्र, तरी देखील दशके उलटूनही हे कैदी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. या फरार कैद्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करून फरार कैद्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

फरार कैद्यांना शोधण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक नेमण्यात आले होते. गुन्हे शाखा अथवा अन्य विभागाने या कैद्यांना पकडले, तर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैदी सापडतील त्या ठाण्यातील कर्मचा-यांवर कारवाई होणार असल्याचे देखील अपर आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले. सर्वच अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर पहिला प्रश्न उपस्थित झाला की, ‘ते सध्या काय करतात?’ मागील वर्षभरात तीन फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 16 आरोपी अजूनही फरार आहेत.

  • गुन्हा दाखल झालेल्या संशयितांवर आरोप निश्चित झाल्यास त्या आरोपीला शिक्षा होते. पण, आरोप निश्चित झाल्यानंतर देखील आरोपी अटक नसेल तर न्यायालय अशा आरोपींना ‘फरारी’ घोषित करते. पिंपरी-चिंचवड शहरात असे 16 फरारी आरोपी आहेत. त्यामध्ये आळंदी, देहूरोड, एमआयडीसी भोसरी, भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यातील आरोपी फरार आहेत. त्यामध्ये सहा आरोपी खुनाच्या गुन्ह्यात फरारी आहेत.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, “मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील 19 आरोपी फरारी होते. त्यातील तीन आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी पाहिजे असलेल्या 77 आरोपींना अटक केली आहे.”

  • कैदयांना मिळतात अभिवचन आणि संचित रजा
    गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आपल्या कुटुंबीयांमध्ये जाता यावे. तसेच त्याचे सामाजिक संबंध स्थापित राहावे, यासाठी अभिवचन (फर्लो) आणि संचित (पॅरोल) अशा दोन प्रकारच्या रजा मिळतात. अभिवचन रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. त्यासाठी त्याला तुरुंग प्रशासनासमोर कोणतेही कारण सादर करावे लागत नाही. अभिवचन रजा ही शिक्षेतली सूट समजली जाते.

संचित रजेसाठी कैद्याला तुरुंग प्रशासनाला सबळ कारण द्यावे लागते. जवळचे नातेवाईक आजारी असतील, घरात एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल अशा महत्वाच्या कामासाठी कैदी संचित रजेसाठी अर्ज करून शकतो. सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा काही कालावधी पूर्ण केल्यावर तसेच कैद्यांचे वर्तन आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवून या अर्जावर विचार करून रजा दिली जाते. 15 दिवसांपर्यंत तुरुंग प्रशासनाला संचित रजा देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे 30 दिवसांपर्यंतची रजा विभागीय आयुक्त देऊ शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.