Chinchwad: चर्चा विधानसभेची ! चिंचवडमध्ये भाजपला आव्हान कोणाचे ?

युतीमुळे भाजप 'सेफ'झोनमध्ये; राष्ट्रवादी काँग्रेस बिकट अवस्थेत

आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. मतदारसंघातून कुणासमोर कुणाचे कडवे आव्हान असणार आहे, कोणाला ही निवडणूक सोपी जाईल याच्या चर्चाना वेग आला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विचार करायचा झाल्यास शहराच्या तीनही विधानसभा मतदार संघात कुणाचे वर्चस्व आहे ? कोण कुणाला वरचढ ठरू शकेल ? कोणत्या पक्षाची स्थिती बिकट आहे ? याचा लेखाजोखा मांडणारी मालिका.

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज-  शिवसेना-भाजपची युती झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप ‘सेफ’झोनमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत युतीच्या मताधिक्यात वाढ झाली. चिंचवडमध्ये भाजप भक्कम परिस्थितीत असून त्यांच्याविरोधात लढण्यासाठी कोणताही प्रबळ पक्ष नाही. तर, लोकसभा निवडणुकीत झालेल्या ‘हाराकिरी’ मुळे राष्ट्रवादी काँग्रेमध्ये निराशेचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत भाजपला कोण आव्हान देणार ? विरोधक आव्हान देतात की लोटांगण घालतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, काही अघटित घडले तरच चिंचवडमध्ये चमत्काराची अपेक्षा ठेवता येईल.

विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपली असून राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. चिंचवड विधानसभा हा राज्यात दुस-या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ आहे. 4 लाख 76 हजार 780 मतदार चिंचवडमध्ये आहेत. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप सलग दुस-यावेळेस या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तत्पूर्वी, विधानपरिषदेत देखील ते आमदार होते.

2014 मध्ये ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करुन जगताप यांनी निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले होते. त्यांना 1 लाख 23 हजार 786 मते मिळाली होती. 60 हजार 297 मतांनी ते विजयी झाले होते. तर, शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी दुस-या क्रमांकाची 63 हजार 489 मते घेत ‘टफ फाईट’ दिली होती. राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 42 हजार 553 मते पडली होती. त्यांचे ‘डिपॉझीट’ गुल झाले होते. काँग्रेसचे कैलास कदम यांना 8 हजार 643 मते आणि मनसेचे अनंत को-हाळे यांना 8 हजार 217 मते मिळाली होती.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. आता भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची पावणे दोन लाखाच्या आसपास मते ‘फिक्स’ मानली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून 1 लाख 76 हजार 475 मते पडली होती. तब्बल 96 हजार 758 हजारांचे मताधिक्य बारणे यांना होते. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीचे पारडे जड मानले जात असून भाजप ‘सेफझोन’मध्ये आहे.

भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप चिंचवडचे आमदार असून हॅटट्रिक करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. भाजपडून जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. जगताप यांचे चिंचवड मतदारसंघात वर्चस्व असून त्यांची स्वत:ची हक्काची 70 ते 80 हजार मते आहेत. 2009 मध्ये अपक्ष लढून देखील 74 हजार मते घेऊन ते निवडून आले होते. मतदारसंघात त्यांची नातीगोती आहेत. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. महापालिकेत त्यांनी भाजपची एकहाती सत्ता आणली आहे. चिंचवडमध्ये भाजपचे 33 नगरसेवक असून चार अपक्षही भाजपसोबत आहेत. पक्ष संघटनेची बांधणी उत्तम आहे. याचा जगताप यांना निवडणुकीत फायदा होऊ शकतो. त्यातच त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी देखील जुळवून घेतले आहे. त्यामुळे जगताप यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महापालिकेत सत्ता नाही. चिंचवडमध्ये पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे केवळ नऊ नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश, मरगळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर जरी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविण्यासाठी सहा जणांनी तयारी दर्शविली असली. तरी, त्यापैकी भाजपच्या तोडीस एकही उमेदवार प्रबळ नाही हे वास्तव आहे.

राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. भोईर, शितोळे आणि जगताप महापालिका निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यापैकी एकही भाजपला तगडे आव्हान देऊ शकेल असा उमेदवार नाही, असे राजकीय जाणकार सांगतात. तर, उर्वरित चार जणांचे प्रभागापुरते मर्यादित अस्तित्व आहे. यापार्श्वभूमीवर भाजपला कोण आव्हान देणार ? विरोधक आव्हान देतात की लोटांगण घालतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार असून सर्वांनी एकमताने एकच उमेदवार दिला. तरच, भाजपसमोर आव्हान निर्माण होऊ शकते.

दरम्यान, गेल्यावेळी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून दुस-या क्रमांकाची मते मिळविलेले राहुल कलाटे यावेळी कोणती भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. यंदा वंचित बहुजन आघाडी देखील राज्यातील 288 मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये वंचितचा देखील उमेदवार असेल. त्याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार राजाराम पाटील यांनी चिंचवडमधून 17 हजार 209 मते घेतली होती.

एकंदरीत या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाची स्थिती भक्कम आहे असे म्हणावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like