Chinchwad : ‘इमारतींचा पुनर्विकास – समस्या व उपाय’ या विषयावर 15 जून रोजी परिसंवाद

एमपीसी न्यूज- इमारतींच्या पुनर्विकासाबाबतच्या विविध पैलूंबद्दल ग्राहकांना माहिती व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागाने “इमारतींचा पुनर्विकास – समस्या व उपाय” या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि.15 जून रोजी संध्याकाळी 5 ते साडेसात या वेळेत चिंचवड येथील घारेशास्त्री सभागृहात होणार आहे.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन अध्यक्षस्थानी असणार आहेत. मराठी विकासक संघाचे अध्यक्ष संजय देशपांडे, अॅड.अभय इनामदार, रेरा कायद्याखाली निर्मित सलोखा मंचाचे सदस्य शिरीष मुळेकर तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रतिनिधी वक्ते म्हणून परिसंवादात सहभागी होणार आहेत. ग्राहकांकडून ई मेल व व्हाॅट्सअॅपवर आलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमात दिली जातील.

अलीकडच्या काळात पुणे व चिंचवड परिसरात 35-40 वर्षांपूर्वी बांधलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास हा प्रश्न ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाचा झालेला आहे. जुन्या इमारतींना वरचेवर कराव्या लागणाऱ्या दुरूस्त्यांमुळे इमारतीच्या मजबूतीबाबत रहिवाशांच्या मनात साशंकता असते. त्याचबरोबर पुनर्विकासामुळे आधुनिक सुखसुविधांनी युक्त नव्या गृहसंकुलात पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहण्याची संधीचा विचार करून त्यातील अनेकजण पुनर्विकासाला अनुकूल असतात.

प्रत्यक्षात पुनर्विकासाच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. त्यातच गेल्या तीन-चार वर्षात अनेक कारणांमुळे विकासकांना पुनर्विकासाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे शक्य झालेले नाही. इतकेच नव्हे तर अनेकांनी रहिवाशांना पर्यायी जागेचे भाडे देणेही बंद केले आहे. असे अनेक पीडित ग्राहक मार्गदर्शनासाठी ग्राहक संघटनांकडे येत आहेत.

त्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाबाबतच्या विविध पैलूंबद्दल ग्राहकांना माहिती व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने पुणे विभागाने पिंपरी, चिंचवड भागातील ग्राहकांसाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग यांनी केले आहे.

ग्राहकांनी आपले प्रश्न [email protected] येथे किंवा 9420157046 या वाॅटस् अॅप क्रमांकावर दि.14 जूनपूर्वी पाठवावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.