Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’मुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांचीही ‘सुट्टी’!

एमपीसी न्यूज – जनता कर्फ्यूच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहण्याला पसंती दिली. गुन्हेगारी प्रवृत्ती देखील या दिवशी बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून असा ‘निरंक’ राहण्याचा प्रसंग प्रथमच घडला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देशातील नागरिकांनी दिला. कोरोनाची दहशत शहरांमध्ये वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकमेकांशी जास्त संपर्क न करणे हाच एक चांगला उपाय असल्याने जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले.

रविवारी दिवसभर शहरातील सर्व नागरिक आपापल्या घरात होते. सर्वजण आपापल्या कुटुंबीयांसोबत असल्याने इतर कोणत्याही बाबींची चिंता राहिली नव्हती. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी देखील यात सहकार्यच केल्याचे म्हटले जात आहे. रविवारी दिवसभर पोलीस रस्त्यावर होते. त्यामुळे नागरिक पोलीस ठाण्यांकडे आपल्या तक्रारी घेऊन फिरकलेच नाहीत. त्यामुळे रविवारी शहरातील सर्वच पोलीस स्टेशन गुन्ह्यांच्या बाबतीत ‘निरंक’ राहिले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. तेंव्हापासून एकही गुन्हा दाखल न होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. त्यामुळे पोलीसंमधून समाधानकारक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान सरकारी आदेशाचे उल्लंघन करणा-या सहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.