Chinese CCTV Threat: चिनी सीसीटीव्ही कॅमेरे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घातक- जितेन जैन

सीसीटीव्ही यंत्रणेत काही गोपनीय उपकरणे बसवून चीनने भारतातील माहिती मिळविण्याची तरतूद आधीच करून ठेवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.  

एमपीसी न्यूज – चिनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे हे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक ठरू शकतात, असा इशारा नामवंत सायबर सुरक्षा तज्ज्ञ जितेन जैन यांनी दिला आहे. इंडिया टुडे वृत्तवाहिनीच्या एका चर्चात्मक कार्यक्रमात त्यांनी ते बोलत होते. 

एखाद्या, दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला अ‍ॅक्सेस करणे चीनला अवघड असले तरी नेटवर्किंगमधील तसेच इंटरनेट अ‍ॅक्सेस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपर्यंत पोहचण्याचे तंत्रज्ञान चीनला अवगत आहे, त्यामुळे चिनी सीसीटीव्ही कॅमेरे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात, असे मत जैन यांनी व्यक्त केले.

आपल्याकडे बहुतेकांनी भारतीय कंपन्यांकडून ही सीसीटीव्ही यंत्रणा बसवून घेतलेली असली तरी भारतीय कंपन्या या केवळ मार्केटिंग करणाऱ्या आहेत. त्यांना या कॅमेऱ्यांविषयी फारशी तांत्रिक माहिती नाही. या कॅमेऱ्यात चीनने काय-काय संपर्क यंत्रणा बसविल्या आहेत, हे केवळ त्या कॅमेरा उत्पादक चिनी कंपन्यांच्या तांत्रिक तज्ज्ञांनाच माहीत आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षित असल्याचा दावा काहीजण करीत असले तरी त्यात तथ्य नाही, असे ते म्हणाले.

चिनी बनावटीच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अ‍ॅडमिन पासवर्डद्वारे चीनला या कॅमेऱ्यांद्वारे उपलब्ध होणाऱ्या डेटाची बॅकडोअर एंट्री मिळू शकते, याकडे जैन यांनी लक्ष वेधले. दिल्ली सारख्या शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे नेटवर्किंग करण्यात आले आहे. अशा नेटवर्किंगला चीन अ‍ॅक्सेस करू शकतो. त्याद्वारे आपल्या देशातील महत्त्वाची माहिती चीनला सहज उपलब्ध होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सीसीटीव्ही यंत्रणा पुरविणाऱ्या चिनी कंपन्या खासगी नाहीत. चिनी कंपन्यांमध्ये 42 टक्के शेअर्स हे चिनी सरकारचे आहेत. चीनमध्ये साम्यवादी पक्ष, सरकार आणि सैन्य हे सर्व एकच आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही यंत्रणेत काही गोपनीय उपकरणे बसवून चीनने भारतातील माहिती मिळविण्याची तरतूद आधीच करून ठेवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.