Chitra Wagh News : ‘पिंपरी-चिंचवडमध्ये आठ महिन्यात 44 खून, 87 बलात्कार’ चित्रा वाघ यांचे ट्विट; नेटीझन्सकडून खमंग प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – ‘आठ महिन्यात पिंपरी-चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार, नगरला तर कोविड सेंटरच पेटवून दिलंय’ असे ट्विट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे. यावर नेटीझन्सकडून खमंग संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3 / 13.  आठ महिन्यात पिंपरी-चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार, नगरला तर कोविड सेंटरचा पेटवून दिलंय.’

राज्य सरकारवर निशाणा साधत वाघ यांनी असेही म्हटले आहे की, ‘आपल्या राज्यात कायद्याची भीती, धाक उरलेला नाही. जरा इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरात लक्ष द्या.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून हे ट्विट करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते ऑगस्ट 2020 या आठ महिन्यांच्या कालावधीत 44 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील 43 खुनाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. मागील वर्षी 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत शहरात 47 खून झाले. त्यातील 45 खुनाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर दोन गुन्ह्यांचा उलगडा अद्याप झालेला नाही.

1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात 87 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील 86 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर एका गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.

तर मागील वर्षी 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2019 या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल 121 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यातील 119 गुन्हे उघडकीस आले आहेत.

चित्रा वाघ यांच्या हातावर पूर्वी राष्ट्रवादीचे घड्याळ होते. त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्षात महिला प्रदेशाध्यक्षा या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वाघ यांनी पक्ष बदलून भाजपचे कमळ हाती घेतले.

भाजपने त्यांना राज्याच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये स्थान देत प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

वाघ यांनी सोमवारी (दि. 5) सकाळी राज्यातील गुन्हेगारी बाबतचे एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात कायद्याची भीती आणि धाक उरला नसल्याची खंत देखील त्यांनी आपल्या ट्विट मध्ये व्यक्त केली आहे.

मात्र, वाघ यांच्या ट्विटवर नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पडत आहेत. ‘हा फक्त 8 महिन्यांचाच रिपोर्ट का?’, ‘महाराष्ट्र राज्यात गुन्ह्यांची नोंद होते आणि रीतसर कारवाई पण होते. सरकार कोणाचेही असलं तरी महराष्ट्र आधी पण एक नंबर होता आणि आताही आहे’, ‘आपण टाकलेल्या पोस्टवर विचार करावा.

नुसता विरोधाला विरोध करू नये. जनता समजदार आहे’, ‘पिंपरी-चिंचवड भाजपच्याच हातात.’ असे म्हणून टीका केली आहे. तर ‘एकही मारा लेकिन सही मारा. क्या बात है’, अशा प्रतिक्रिया देऊन स्तुतीसुमने देखील उधळली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.