Kamshet : मावळातील चॉकलेट शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – कामशेत आणि मावळ परिसरात दहशत पसरवणा-या तसेच गुन्हेगारी कुरापती करणा-या चॉकलेट उर्फ धनेश दिलीप शिंदे टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. शहरातील व्यापा-याचे अपहरण करून कोट्यवधींची खंडणी मागितली. तसेच कार्ला येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात या टोळीचा सहभाग आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे (वय 30, रा. कामशेत), दिग्या उर्फ रोशन बाळू शिंदे (वय 20), सोन्या उर्फ प्रसाद तुकाराम शिंदे (वय 19), श्रीधर श्रीकांत घुले, अक्षय प्रकाश वाघ (वय 23), दिनेश दीपक शिंदे, शुभम हिराचंद गायकवाड (वय 21), मनोज गणेश देशमुख (वय 22), राजु ज्ञानेश्वर पठारे (सर्व रा. कामशेत) अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

कामशेत शहरातील व्यापारी अनुराग सुरेश गदिया (वय 29) यांचे चॉकलेटच्या टोळीने 8 जुलै रोजी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करून पवनानगर धरणाजवळ नेले. तिथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास पुन्हा अपहरण करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपींच्या शोधात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि कामशेत पोलिसांचे पथक तयार केले. या पथकाकडून या गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली. यातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या खंडणीच्या प्रकरणातील आरोपी दिनेश शिंदे याने 22 जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिवली गावात मंथन सातकर या इसमाला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तसेच कार्ला येथे एका बंगल्यावर झालेल्या गोळीबारामध्ये चॉकलेटच्या टोळीतील एका सदस्याचा सहभाग आढळून आला. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी शिंदे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

चॉकलेटच्या टोळीची मावळ परिसरात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना अडचण येत असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चॉकलेट टोळीतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला. त्यानुसार त्यांनी संबंधीत आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.