CID News : ‘सीआयडी’च्या सर्च प्रणालीला देशपातळीवरील प्रथम पुरस्कार

आयसीजेएस आणि सीसीटीएनएस सर्च प्रणालीचा गौरव

एमपीसीन्यूज : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आयसीजेएस आणि सीसीटीएनएस सर्च प्रणालीला देशपातळीवरील प्रथक क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नॅशनल क्राईम ब्युरो, नवी दिल्ली यांच्यावतीने ऑनलाईनरित्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सीआयडीच्या सीसीटीएनएसला इम्प्लिमेंन्टेंशन ऑफ आयसीजेएस अ‍ॅण्ड सीसीटीएनएस सर्च वर्गवारीतून देशातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे.

पोलीस तपासामध्ये गुन्ह्यांचे प्रकटीकरण करण्यासाठी आयसीजेएस आणि सीसीटीएनएस सर्च प्रणालीची मदत होते. या प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे आणि गुन्ह्यांची माहिती उपलब्ध आहे.

त्यानुसार गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपोर्ट चारित्र्य पडताळणी, वाहनांबाबतची माहितीची पडताळणी करण्यासाठी प्रणालीचा उपयोग केला जातो. या प्रणालीचा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

सीआयडीने सीसीटीएनएस आणि आयसीजेएस प्रणालीच्या साह्याने 1 हजार 573 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

त्यामध्ये 743 चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध, 693 हरविलेल्या आणि बेवारस नागरिकांचा शोध, 7 हजार 883 आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, 507 प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले आहेत.

यामध्ये 13  हजार 721  नागरिकांची पडताळणी करण्यात आली असून 4 हजार 601  जणांविरूद्ध गुन्हे नोंद असल्याचे दिसून आले आहे.

त्याशिवाय 1 लाख 17 हजार 26  जणांच्या पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी प्रकरणांमध्ये 2 हजार 837 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संभाजी कदम, नंदा पाराजे, जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पांडे, शशिकला काकरे, प्रमोद जाधव, जावेद खान, किरण कुलकर्णी, संदीप शिंदे, प्रियांका शितोळे, किर्ती लोखंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.