Wakad : पान टपरी फोडून बिडी बंडल चोरीला

एमपीसी न्यूज – पाच चोरट्यांनी पान टपरी फोडून बिडी बंडल, कॅन्डी गोळ्याच्या बरण्या आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) पहाटे दीडच्या सुमारास काळाखडक वाकड येथे घडली. पोलिसांनी यातील एका चोरट्याला अटक केली आहे.

रमेश मलाप्पा येगरे (वय 33, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह राहुल चव्हाण आणि अन्य तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अमित किसन खेडकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक येथे जाधव कॉर्नर जवळ साई पान शॉप ही पान टपरी आहे. पाच चोरट्यांनी मिळून बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास पान टपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. टपरी मधून कॉटन स्वब बिडी बंडल, कोलगेट मेंटॉस नॅचरल इटली कोकनेट कॅन्डी गोळ्याच्या तीन बरण्या आणि रोख रक्कम असा एकूण एक हजार 920 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुकाने फोडण्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. मंगळवारी देखील हिंजवडी परिसरात एक किराणा दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातून 120 कट्टे तांदूळ आणि तेलाचा बॉक्स चोरून नेला. संचारबंदीच्या काळात होणाऱ्या चोऱ्या हे पोलिसांपुढे नवीन आव्हान निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.